भयावह! पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास, बुलढाण्यातील धक्कादायक व्हिडीओ
बुलढाण्यातील जिल्ह्यातील जळगाव आणि पिंपळगावच्या गावकरी आणि विद्यार्थ्यांना पुलाशिवाय जीवघेणा प्रवास करावा लागतोय. अनेक विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नदीतून दररोज पायी चालत जावं लागत आहे.
संदीप वानखेडे, बुलढाणा | 27 जुलै 2023 : देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आपण एकीकडे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव साजरा करतोय. पण दुसरीकडे राज्यात काय परिस्थिती आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय. प्रशासनाकडून नागरिकांना सुखरुपस्थळी स्थलांतर करण्याचं काम सुरु आहे. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जिल्ह्यातील एका गावातील शालेय विद्यार्थी चक्क नदीच्या पाण्यातून रोज ये-जा करतात. ही सर्व खूप लहान आहेत. नदीला सध्या पूर आलेला नाही. पण जवळपास गुडघ्याभर नदीच्या पाण्यातून चालत जावं लागतंय.
सध्या पावसाचं वातावण आहे. नदीला कधी पूर येईल किंवा नदीला प्रवाह कधी येईल ते सांगता येत नाही. पण तरीही विद्यार्थी नाईजास्तव येथून ये-जा करतात. या ठिकाणी पूल बांधण्यासाठी गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील जळगाव आणि पिंपळगाव या गावांच्यामधून एक नदी वाहत आहे. या नदीवर पूल व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही गावातील ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही या नदीवर पूल होत नसल्याने या नदीपात्रातून जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करत आहेत.
भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद
विद्यार्थ्यांचं नदीच्या पाण्यातून चालत चाणारं दृश्य ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात कैद झालंय. बुलढाण्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडतोय. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून चालत जावून शाळेत जावं लागत आहे. हे खरंत अतिशय भयानक आणि भयावह आहे. नदीच्या पाणी पात्रात अचानक वाढ झाली, पाण्याचा प्रवाह वाढला तर किती मोठं संकट ओढावू शकतं याचा अंदाज शासनाला येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
नदीला पूर आल्यानंतर नागरिक अडकून पडतात
जळगाव आणि पिंपळगाव या दोन्ही गावांच्यामधून आमना नदी वाहते. जळगावमधील शेकडो विद्यार्थी पिंपळगाव येथील शाळेत शिक्षण घेत आहेत. तर दोन्ही गावांतील ग्रामस्थ व्यवहार आणि नातेसंबंध असल्याने नेहमीच ये-जा करतात. एकूणच काय तर या गावांना आमना नदीचे पात्र ओलांडून ये-जा करावी लागते. नदीला पूर आल्यानंतर दोन्ही गावातील नागरिक अडकून पडतात.
या नदीवर पूल व्हावा यासाठी गावकरी मोठा प्रयत्न करत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांनाही या संदर्भात निवेदने देण्यात आले आहेत. पण अजूनही हा पूल होत नसल्याने विद्यार्थ्यांना या नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.