जे घडायला नको होतं ते घडलं, राहुल गांधी यांच्या सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना अतिशय विचित्र प्रकार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या बुलढाणा जिल्ह्यातून प्रवास करते आहे. या प्रवासादरम्यान आज एक विचित्र प्रकार घडला.
बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या बुलढाणा जिल्ह्यातून प्रवास करतेय. या प्रवासादरम्यान राहुल गांधी यांची आज भास्तान येथे सभा झाली. यावेळी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 735 शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. पण या दरम्यानच एक अनपेक्षित आणि खूप विचित्र घटना घडली. शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना सभेस्थळी अज्ञातांनी फटाके फोडले. त्यामुळे राहुल गांधी रागावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच पोलिसांकडे फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.
राहुल गांधी यांचं भाषण सुरु होताच संबंधित प्रकार घडला. राहुल गांधी शहीद शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त करत असताना अचानक सभेच्या बाहेर जोरजोराच्या आवाजात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी रागावले. त्यांनी संबंधित घटनेवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी आणि आयोजकांनी संबंधित प्रकारावर निषेध व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी यावेळी फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचना पोलिसांना दिली.
“आज ज्यांनी हे केलंय त्यांनी हिंदुस्थानमधील 735 शेतकऱ्यांनाचा अपमान केलाय”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी कायदा रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना कोणीतरी जाणूनबुजून फटाके लावले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी यावेळी आपलं भाषण थोडक्यात उरकलं. आयोजकांनी अचानक फटाके वाजवलेल्यांचा निषेध व्यक्त केला. सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित कार्यक्रम उरकवण्यात आला.
दरम्यान, सभेच्या ठिकाणी सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज उपस्थित होते. सभेच्या ठिकाणी अनोख्या पद्धतीने बैलगाडी, मशाल ठेवण्यात आले होते.