विदर्भात अवकाळी पावसाचा फटका, कुठं काय परिस्थिती, हवामानाचा अंदाज काय?
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भर दुपारी रस्त्यावर अंधार दाटला. गाडीचे हेडलाईट लावून वाहन चालवण्याची वेळ आली.
नागपूर : विदर्भात सर्वत्र भर दुपारी ढग दाटून आले. एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. भर दुपारी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात पावसाचा फिल येत होता. एकीकडे कुलर काढले असताना दुसरीकडे भर दुपारी थंड वारा वाहत होता. त्यामुळे घरात कुलरची गरज पडली नाही. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. शेतातील पिकांसाठी हा अवकाळी पाऊस मारक ठरत आहे. नागपुरात दुपारी तीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
वीज पडून आठ शेळ्या ठार
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज दुपारी झालेल्या विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. यावेळी खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील शेतकऱ्याच्या शेळ्यांवर वीज पडून आठ शेळ्या जागीच ठार झाल्या. शेळी मालक वसंतराव इंगळे हे शेतात बकऱ्या चरायला गेले होते.
नुकसानभरपाईची मागणी
अचानक विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस सुरू झाला. बकऱ्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यावेळी त्यांचे मोठं नुकसान झाले. पंचनामा करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेळी मालक वसंतराव इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यवतमाळातही अवकाळी पाऊस
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. काल हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीचा वर्तविला होता. त्यानुसार आज उद्या दोन दिवस पाऊस पडणार आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
अमरावतीत पिकांचे नुकसान
अमरावती जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लावली. तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावाच्या परिसरामध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यानुसार पाऊस पडत आहे.
गहू, संत्रा पिकांचे नुकसान
मागील महिन्यातील पावसामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अमरावतीत जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भर दुपारी रस्त्यावर अंधार दाटला. गाडीचे हेडलाईट लावून वाहन चालवण्याची वेळ आली. अवकाळी पावसामुळे पुन्हा गहू, संत्रा आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यामुळे छोटे फ्लेक्स फाटले. सुमारे तासभर अमरावती शहरात अवकाळी पाऊस पडला.