MLA Shweta Mahale : बुलडाण्यात मंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? आमदार श्वेता महाले म्हणतात, पक्ष जो निर्णय देईल तो स्वीकारेल
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर चिखलीमध्ये अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
बुलडाणा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याची सूत्रे हाती घेतली. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तार देखील होणार आहे. त्यासाठी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्ली दरबारी पाठविण्यात आली असल्याची माहिती आहे. संभाव्य यादीमध्ये चिखली मतदार संघाच्या (Chikhli Constituency) भाजपा आमदार श्वेता महाले यांचे नाव असल्याची माहिती आहे. त्यावर पहिल्यांदा श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया दिली. मी पक्षाकडून कधी मंत्री किंवा इतर पदाची अपेक्षा केलेली नाही. त्या यादीबाबत मला कुठलीच माहिती नाही. मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली कुठलीही जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे.
संजय रायमुलकर, संजय कुटे हेही दावेदार
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर चिखलीमध्ये अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आपले पारंपरिक नृत्य सादर करत शहरातून रॅली काढली होती. यावेळी शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यादरम्यान श्वेता महाले माध्यमांशी बोलत होत्या. बुलडाणा जिल्ह्यात तीन पंचवार्षिक आमदार असलेले शिवसेनेचे संजय रायमुलकर त्याचबरोबर फडणवीस यांच्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले डॉ. संजय कुटे हे दावेदार असल्याने त्यांची मंत्रिमंडळ वर्णी निश्चित समजल्या जात होती. मात्र, आता महिला उमेदवाराचा विचार करता श्वेता महाले ह्या मराठवाडा, विदर्भात एकमेव महिला आमदार आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींकडे त्यांची चांगली पत आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यात लाल दिवा कुणाला मिळतो. किती मिळतील, याकडे बुलडाणा जिल्हा वासीयांचे लक्ष लागून आहे.
तिरंगी फुगे हवेत सोडले
देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर एका आदिवासी महिलेला स्थानापन्न करणे हा देशातील प्रत्येक महिलेचा सन्मान आहे, असे भावोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदन सोहळ्यात व्यक्त केले. आज 25 जुलै रोजी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा मठ, चिखली येथे हा अभूतपूर्व अभिनंदन सोहळा झाला. मिरवणुकीच्या आरंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी मेळघाटच्या आदिवासी बंधू-भगिनींच्या पथकाने पारंपरिक नृत्याने नागरिकांची मने जिंकली. मिरवणूक छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर महाराजांना अभिवादन करून हजारो तिरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. चिखलीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील महिलांसह डॉक्टर, वकील, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, फळ भाजी विक्रेत्या, शेतकरी, शेतमजूर, ब्युटीशियन, उद्योजिका, लघु व्यावसायिक, बँकर्स महिला सहभागी झाल्या होत्या. शालेय विद्यार्थिनीही मोठ्या उत्साहात उपस्थित होत्या. मातला, सिंदखेड, पांगरी, हिवरा नाईक, किन्ही नाईक वैरागड येथील आदिवासी सहभागी होते. फटाके व ढोलताशांच्या गजरात हा सोहळा पार पडला. यावेळी डॉ. संध्या कोठारी, डॉ. आरती पालवे, मनीषा सपकाळ, प्रियांका कंजदेकर यांचीही भाषणे झाली.