पुणे जिल्ह्यातील दोन्ही बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही स्पर्धा उद्या होणार होत्या. मात्र या स्पर्धांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे.
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव (Corona) पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. अशावेळी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही स्पर्धा उद्या होणार होत्या. मात्र या स्पर्धांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
राज्यासह मुंबई, पुणे, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात आज 8 हजारापेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुणे शहरात 412 नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सध्या 1 हजार 799 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यत तात्पुरती स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय.
आढळराव पाटील आणि सुनिल शेळकेंकडून स्पर्धेचं आयोजन
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. मात्र, उद्या होणारी ही स्पर्धा तात्पुरती स्थगित केली आहे.
बैलगाडा मालकांच्या आनंदावर पुन्हा विरजण
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणार होती. आंबेगावमधील लांडेवाडीत दरवर्षी शितळादेवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण गावातील दत्तजयंती उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली होती. 7 ते 8 वर्षानंतर गावातील बैलगाडा शर्यत पार पडणार होती त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी
सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून शर्यत भरवण्यासाठी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यासाठी एकूण 26 नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे गावी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली येशील शेतकरी आंदोलनातील संदीप गिड्डे यांच्या पुढाकारातून ही बैलगाडा शर्यत होणार आहे.
इतर बातम्या :