जात टार्गेट की नेते टार्गेट? वाचा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
राज्यात सध्या वेगवेगळ्या कारणांनी नेत्यांची जात चर्चेत आलीय. मराठा आरक्षण, त्यानंतर बीडमधली जाळपोळ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपातही जात आणि वर्णाचा मुद्दा येतोय. मात्र बीडमध्ये जी घटना घडली, त्यावरुनही दावे-प्रतिदावे करण्यात आले.
मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : आरक्षण, बीडमधली जाळपोळ आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा शब्द चर्चेत आलाय. विशेष म्हणजे आरक्षण आंदोलन, बीडमधली जाळपोळ आणि त्यावर सत्ताधारी नेत्यांनीच केलेला जात किंवा विशिष्ट समाजाच्या उल्लेखानं ही चर्चा अजून वाढली. बीडच्या जाळपोळीत काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केलं गेल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं. हा दावा त्यांचेच सत्तेतले सहकारी प्रकाश सोळुंखेंनी नाकारला. मात्र नंतर त्यांनीच आपल्या घरावरच्या हल्ल्यात इतर जातीचेही लोक असण्याचा दावा केला. आता नेत्यांनीच जाळपोळीवरुन जातनिहाय वर्गीकरण केल्यानं कोणकोणत्या राजकीय लोकांवर बीडमध्ये हल्ले झाले हे जर पाहिलं तर जाळपोळीला जातीय स्वरुप होतं की मग राजकीय? अशी शंका येते.
कुणाकुणाच्या घरी हल्ला झाला?
- अजित पवार गटाचे प्रकाश सोळुंखे, त्यांचे बंधू धैर्यशील सोळुंखेंच्या घरावर हल्ला झाला- जात मराठा
- अजित पवार गटाचेच अमरसिंह पंडित यांच्या घरावर दगडफेक- जात मराठा
- सध्या कोणत्याही पक्षात नसलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला- जात तेली
- शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला- जात तेली
- शिंदे गटाचे कुंडलिक खाडे यांच्या ऑफिसवर हल्ला- जात मराठा
- शिंदे गटाचेच सचिन मुळूक यांच्या ऑफिसवर हल्ला- जात मराठा
- भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंच्या ऑफिसवर हल्ला- जात मराठा
- ठाकरे गटाचे अनिल जगताप यांच्या ऑफिसवर हल्ला- जात मराठा
- भुजबळ समर्थक सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर हल्ला- जात माळी
- धनंजय मुंडे समर्थक बाप्पासाहेब घुगे यांच्या ऑफिसवर हल्ला- जात वंजारी
ही यादी बघितल्यावर जुनी भांडणं-राजकीय वैर देखील बीडच्या जाळपोळीला कारणीभूत होती का? याचा तपास सुरु आहे. मात्र एकीकडे पोलीस तपास सुरु असतानाच विशिष्ट जातीच्या लोकांवर हल्ले झाले असं सत्ताधारी नेतेच सांगत आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे बीडमध्ये ज्या क्षीरसागरांच्या घरांवर हल्ला झाला, त्यांनी कोणत्याही जातीचं नाव न घेता यामागे समाजकंटक होते असं म्हटलंय. मात्र नागपूरच्या तेली महासंघाच्या नेत्यांनी बीडच्या घटनेवरुन जातीवरचा हल्ला सहन न करण्याचा इशारा दिलाय. तेली समाजाच्या घरांवर हल्ले झाले तर राज्यातील तेली समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान बीडमधली जाळपोळ हा सूनियोजीत कट असल्याचा दावा सत्ताधारी करतायत. तर विरोधकांनी सत्ताधारीच राज्यात जाती-जातींत भांडणं लावत असल्याचा आरोप केलाय. जाळपोळीमागे कुणीही असलं तरी त्यांना तातडीनं कठोर शिक्षा व्हायला हवी. मात्र पोलीस तपास सुरु असेपर्यंत बीडमधल्या जाळपोळ जातीच्या नावानं पुन्हा भडका घेणार नाही, याची सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. कारण राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर नेते राजकीय संस्कृतीचं कारण देत दुसऱ्याच दिवशी एकत्र येतात. पण समाजाची विस्कटलेली घडी, आणि जातीत विभागलेली माणसात एकोपा नांदायला खूप वेळ लागतो.