Obc reservation : निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याऐवजी भाजपला मतदान करू नका!-भुजबळ
निवडणुकीवर बहिष्कार न टाकता भाजपला मतदान करू नका असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे, त्यामुळे आता भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून जोरदार वाद सुरू आहे. इंपेरिकल डेटावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वार-पलटवार सुरू आहेत. इंपेरिकल डेटा गोळा करणे ही राज्याची जबाबदारी आहे, असे भाजप सांगत आहे. तर केंद्र सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा दिला नाही, म्हणून ओबीसी आरक्षण स्थगित झाले असे महाविकास आघाडी आरोप करत आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी आता भाजपवर काही सवाल उपस्थित केले आहेत.
भाजपला मतदान करू नका
इंपेरिकल डेटावरून आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असताना, अनेक ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिसू लागले आहेत, त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार न टाकता भाजपला मतदान करू नका असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे, त्यामुळे आता भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. किमान आगामी येणाऱ्या निवडणुका तरी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
इंपेरिकल डेटाबद्दल पंकजा मुंडे भाषणात बोलल्या
इंपेरिकल डेटासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी केंद्राला पत्रे लिहिली असे महाविकास आघाडी सांगत असतानाच, इंपेरिकल डेटा गोपीनाथ मुंडे यांनी जमा केला असे पंकजा मुंडे आपल्या भाषणात बोलल्या आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतंय? हे समजायला मार्ग नाही.
ओबीसींची जनगणना केली नाही
ओबीसी जनगणनेचा डेटा आम्हाला द्या असं आम्ही सर्वोच्च न्यायालयात मागणी केली. त्यावर हा डेटा सदोष असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. त्यावर आम्ही हा डेटा आम्हाला द्या आम्ही दुरुस्त करून घेतो असं सांगितलं. त्यानंतर केंद्र सरकारने त्याला दुसरं प्रतिज्ञापत्रं जोडलं आणि हा डेटा ओबीसींचा नाहीच असं स्पष्ट केलं. हा डेटा ओबीसींचा नाही असं केंद्र सरकार कधीच म्हणालं नव्हतं. पण सर्वोच्च न्यायालयात गोष्टी क्लिअर झाल्या. त्यांना आमचा डेटा द्यायचा नव्हता, त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका घेतली की आम्ही ओबीसींची जनगणना केली नाही. डेटा गोळा केला नाही. मग गोपीनाथ मुंडे यांनी कसली मागणी केली होती? समीर भुजबळ, वीरप्पा मोईली यांनी कोणती मागणी केली होती? देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी कोणता डेटा देण्याची मागणी केली होती? असा सवाल भुजबळ यांनी केला.