छत्रपती संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून अडविले;सकल मराठा समाज आक्रमक
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तुळजापूर तहसीलदार व्यवस्थापक यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते असे मत व्यक्त होत आहे.
उस्मानाबादः छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना तुळजापूर मंदिर (Tuljapur Temple) संस्थानकडून चुकीची वागणूक देत गैरवर्तन केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या (Maraha Kranti Morcha) पदाधिकाऱ्यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी अडवल्याने स्वतः संभाजी महाराज यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तर महाराज यांचे समर्थक व सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल संध्याकाळी 9 वाजता संभाजीराजे छत्रपती दर्शनासाठी आले असताना त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडविले गेले.
गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी ज्या पूजाऱ्यांची पाळी आहे ते वगळता सर्वांना मंदिर गाभरा प्रवेश बंदी केली आहे. या नियमाचा आधार घेत संभाजी महाराज यांना अडविण्यात आले, या नियमाचा फटका संभाजी राजे यांनासुद्धा बसला.
छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी आहे. छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील तुळजाभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.
सरकारी नियम दाखवले
काल संध्याकाळी 9 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती आले असता मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात आला. सरकारी नियम दाखवत महाराजांना जाण्यापासून रोखण्यात आले. राजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी विनंती करूनही त्यांना आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही.
मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन
मंदिरातीळ कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या अन् मंदिर प्रशासनातील कर्मचारी यांनी गैरवर्तन केले असा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे. या प्रकरणी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संबंधित मंदिर तहसीलदार, व्यवस्थापक आणि धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी निलंबन करावे अन्यथा राज्यभर जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच दर्शन
छत्रपती संभाजीराजे तुळजाभवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात, तेव्हा ते परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात. यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता, त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते. तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. छत्रपती संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही पाळल्या जातात.
छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तुळजापूर तहसीलदार व्यवस्थापक यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते असे मत व्यक्त होत आहे. निजामाने आणि इंग्रजानी देखील या परंपरामध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही त्या परंपरा हे सरकार व प्रशासन मोडू पाहत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला.
धार्मिक भावनांचा अपमान
तुळजाई नगरीत देवीच्या दारात वाद नकोत म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी जरी शांततेने हे प्रकरण हाताळले असले तरी सरकारने समस्त महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचा हा अपमान केला आहे. सरकारने आणि प्रशासनाने समस्त महाराष्ट्र वासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल माफी मागावी आणि हा प्रकार पुन्हा घडू नये याची हमी द्यावी अशी उद्विग्न भावना यावेळी पत्रकार परिषदेत मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही
छत्रपती संभाजी राजे यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू किंवा कृती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मंदिर संस्थानला करवीर संस्थानच्या रोजच्या अभिषेक व्यतिरिक्त का मुर्तिजवळ थांबता आलेले नाही याचे कारण देवूल कवायत कलम 36 नुसार कुळाचार विधी व्यतिरिक्त कमाविसदार पुजारी यांचे व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तरी सर्व VVIP यांना सिंहासनापासून 5 फुटांवर नेहमीप्रमाणे दर्शन व आरती केली जाते. कलम 36 मुळे कुल विधी व्यतिरिक्त जिल्हाधिकारी स्वतः किंवा कोणीही प्रवेश करू शकत नाही.
शासनाकडे अहवाल पाठवला
करवीर संस्थान व संभाजीराजे छत्रपती कालच्या गैरसोयीच्या कारणाने शासनाला कलम 36 आणि हायकोर्ट केस याबद्दल शासनाकडे अहवाल पाठवला जात आहे. करवीर संस्थांनची मानाची पूजा संभाजी राजे छत्रपती यांच्या आगमनापूर्वी झालेली होती. यानंतर जेव्हाही ते दर्शनाला येणार असतील तेव्हा करवीर संस्थानचा अभिषेक त्यांचे आगमन पाहून करावे जेणेकरून त्यांचे हस्ते दुग्ध अभिषेक होईल अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत.
कायदेशीर अडचण नाही
त्यामुळे कायदेशीर अडचण न येता त्यांच्या दौऱ्याच्या वेळी आगमन वेळेत करवीर संस्थान पूजा दुग्ध अभिषेक व नैमित्तिक विधी करण्याचे नियोजन करवीर संस्थान प्रतिनिधी आणि तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापक समन्वयाने करतील अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
करवीर संस्थान मंदिराचे मानकरी
करवीर संस्थान हे तुळजाभवानी मंदिराचे मानकरी असून त्यांचा मान ठेवणे हे मंदिर संस्थानचे कर्तव्य आहे. याबाबत कृपया कोणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये.
नैमित्तिक कुळाचाराला बाधा
याबाबत तांत्रिक कारणाने नैमित्तिक कुळाचाराला बाधा येऊ नये यासाठी नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापक यांनी करवीर संस्थानच्या प्रतिनिधींशी चर्चा करून यापुढे नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत असे तुळजा भवानी मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.