जरांगे उमदेवार देणार… छगन भुजबळांनी दंड थोपाटले; म्हणाले, येऊ द्या, तुमचं…
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी छगन भुजबळ यांना मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याबाबत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सगेसोयरे या मागणीसाठी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे सगेसोयरेच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी या गावात नुकतंच पुन्हा उपोषणाला बसले होते. राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाने उपोषणस्थळी जात मनोज जरांगे यांची समजूत काढली. यानंतर जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. राज्य सरकारने एक महिन्यात आपली मागणी मान्य केली नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारांना उतरवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
छगन भुजबळ यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी भुजबळांना मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व 288 जागांवर निवडणूक लढवली तर? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी आपली भूमिका मांडली. “लोकशाही आहे. कोणीही उभं राहू शकतं. चांगली गोष्ट आहे. त्यांचा कॉन्फिडन्स आहे. त्यांची किती ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे. येवल्यात मराठा उमेदवार आला तर आवश्य या. स्वागत आहे”, असं भुजबळ म्हणाले.
मराठा की दलित, मुस्लिम, आदिवासींमुळे फटका बसला?
“मुस्लिम समाज युतीपासून दूर गेला होता. उदाहरण सांगतो. धुळ्यात सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात युतीचा उमेदवार फार पुढे आहे. एकच मतदारसंघ आहे, मालेगाव. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई यांना 1 लाख 96 हजार मते पडली. आणि युतीच्या उमेदवाराला 4 हजार मते पडली. एकाच मतदारसंघात 2 लाखाने पुढे. दुसऱ्या 5 मतदारसंघातील खड्डा भरून काढला. म्हणजे मुस्लिम विरोधात होते”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“पिंपळगावच्या मोदींच्या सभेत सांगितलं, ४०० पारचा नारा लावला. त्याचा अर्थ संविधान बदलणार असा लावला गेला. त्यामुळे दलित आणि आदिवासी घाबरले. तो घटकही बाजूला गेला. मराठा आंदोलन हे दोन तीन जिल्ह्यात प्रकर्षाने आहे. ते मराठवाड्यात आहे. विदर्भात काही जाणवलं? विदर्भात ही जिथे युतीचे १० खासदार होते तिथे तीनच होते. तो परिणाम कसला आहे? हा परिणाम काही ठिकाणी झाला. पण तो दोन ते तीन जिल्ह्यात झाला असता. अमोल कोल्हे का निवडून आले? मराठा मते गेल्यावर माणसे पडतात. अमोल कोल्हे आले ना निवडून? काही मतदारसंघात मराठा मतदारांचा प्रभाव जाणवला”, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.