मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव; भुजबळांचा आरोप, राणेंबद्दल म्हणाले…
केंद्र सरकारने आजपर्यंत तमिळ, संस्कृत, तेलगू, मल्याळम, उडिया, कन्नड या 6 भाषांना अभिजाततेचा दर्जा दिला. कोणत्याही भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याचे काही निकष असतात. त्यात भाषेचे वय हे दीड ते दोन हजार वर्षे असावे, त्या भाषेतले साहित्य सर्वश्रेष्ठ असावे, त्या भाषेने कोणत्याही भाषेची नक्कल करू नये आणि...
नाशिकः जगभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. देशभरातल्या मराठी भाषकांनी मराठीला अभिजात दर्जा द्यावा, असे साकडे केंद्र सरकारला घातले आहे. यावरून आता मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. विशेष म्हणजे यापूर्वी मंत्री सुभाष देसाई यांनीही हाच आरोप केला होता. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची 4 हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) याच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना पाठविण्यात आली आहेत.
काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की,मराठी भाषा अडीच हजार वर्षांपूर्वीची प्राचीन भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 7 वर्षांपासून लढा सुरू आहे. इतर भाषांना अभिजात दर्जा मिळाला. मात्र, मराठीला का नाही. मराठी भाषेबाबत दुजाभाव केला जातोय, असा आरोप भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई सारेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावाच लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबद्दल काही माहिती नसल्याचे ते म्हणाले. नियमांप्रमाणे जी कारवाई करायची ती केली जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
अभिजाततेचे निकष कोणते?
केंद्र सरकारने आजपर्यंत तमिळ, संस्कृत, तेलगू, मल्याळम, उडिया, कन्नड या 6 भाषांना अभिजाततेचा दर्जा दिला. मात्र, मराठीला हा दर्जा देण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप होत आहे. कोणत्याही भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याचे काही निकष असतात. त्यात भाषेचे वय हे दीड ते दोन हजार वर्षे असावे, त्या भाषेतले साहित्य सर्वश्रेष्ठ असावे, त्या भाषेने कोणत्याही भाषेची नक्कल करू नये. विशेष म्हणजे त्या भाषेचे मूळ रूप आणि आत्ताचे रूप यांच्यात नाते असावे. हे सारे निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तसा अहवालही केंद्र सरकारला पाठवला आहे.
इतर बातम्याः
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग