शरद पवार यांना कुशल प्रशासक समजत होतो, त्या प्रकरणावरुन छगन भुजबळ म्हणाले…
OBC Reservation | जालन्यात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एल्गार सभा झाली. या सभेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. मनोज जरांगे पाटील याच्यावर टीका केली. राजकीय लोकांना गावबंदी घातल्यावरुन भुजबळ कडाडले. महाराष्ट्राचा सात, बारा तुमच्या नावावर आहे का? असा प्रश्न विचारले.
सागर सुरवसे, जालना | 17 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरु आहेत. त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्र आले. त्यांनी जालन्यातील अंबड येथे सभा घेतली. या सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगले आक्रमक झाले. त्यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला. आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले. आरक्षणासाठी जाळपोळ केली? छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, मग महाराजांकडून तुम्ही असे शिकला का? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्राचा सात-बारा तुमच्या नावावर आहे का?
आमदारास गाव बंदी, मंत्र्यांना गावबंदी…महाराष्ट्र तुमच्या सात-बाऱ्यावर लिहून दिला आहे का? आता जसेच तसे उत्तर द्यावे लागले. मी म्हणालो ‘करेंगे या मरेंगे’, त्यावर तुमचा पाहुणा म्हणतो. भुजबळ हिंसाचाराची भाषा करत आहेत. परंतु ‘करेंगे या मरेंगे’ हा महात्मा गांधी यांचा नारा आहे. शरद पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण दिले असे सांगतात. पण मी एक गोष्ट सांगतो, की मंडल आयोग हा व्ही. पी. सिंग यांनी लागू केला होता. पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला पण त्यासाठी आम्ही मागणी केली.
लाठीचार्ज झाल्यावर शूर सरदार घरी जाऊन झोपले
लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जावून पळून झोपले. त्यांना राजेश टोपे, रोहित पवार यांनी घरातून रात्री तीन वाजता आणले. कारण दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी शरद पवार येणार होते. दुसऱ्या दिवशी शरद पवार आले. परंतु त्यांना हे सांगितले गेले नाही की, लाठीचार्ज का झाला? शरद पवार यांना ते सांगितले असते तर त्यांची भूमिका वेगळी असते. कारण आजही मी शरद पवार उत्कृष्ठ प्रशासक समजतो, असे भुजबळ म्हणाले.
पोलिसांचा लाठीचार्ज पाहिला पण…
पोलिसांनी केलेला लाठीचार्ज सगळयांनी पहिला. परंतु त्या ठिकाणी फक्त 70 पोलीस कर्मचारी होते. तेव्हा दगडाचा मारा सुरु झाला. हे 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? त्यात अनेक महिलाही होत्या. महिला आयोगाने त्या महिला पोलिसांकडे जाऊन त्यांची चौकशी करावी. तुम्ही शिवाजी महाराज यांचे नाव घेता. महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले. पण तुम्ही काय केले? महिला पोलिसांवर दगडफेक केली. त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे होते की माझे पोलिस जखमी झाले. या उलट गृहमंत्री यांनी पोलिसांचे निलंबन केले.