राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्याकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. या दरम्यान छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या. आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू. माझी पतंग कोणी कापली नाही. मी या येवला मतदारसंघाचा आमदार आहे, आणि तो पाचव्यांदा आहे. माझा जन्म येवल्यातील नाही, माझे कुटुंब येवल्यातील नाही. तरी मतदारसंघातील जनतेने मला मागील २० वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी बहाल केली. माझी पतंग कोणीही कापणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.
राज्यभरात आता मकरसंक्रांतीचा उत्साह आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवली जाते. अनेकांकडून पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा वापर केला जातो. पण त्यामुळे दुचाकीवरुन चालणाऱ्यांच्या गळ्याला गाडी वेगात असताना नायलॉनचा मांजा लागला तर मोठा अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नायलॉनचा मांजा वापरु नये, असं आवाहन केलं आहे. “माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, उत्सव आनंदात, उत्साहात साजरा झाला पाहिजे. उत्सव हे दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना आणि विक्रेत्यांना थांबवा. पोलिसांच्या ताब्यात त्यांना द्या”, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांना यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “विषय संपला आहे. माझ्या विरुद्ध कोणी काही बोलले नाही तर मीही कोणाविषयी बोलणार नाही. विषय संपला. सर्वांना शुभेच्छा”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“काही प्रमाणात हे खरं आहे. नियम काही वेगळे होते, त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही. मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही. गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा योजनेचा उद्देश आहे. जे नियामत बसत नाही. त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यात येवू नये. याच्यापुढे लोकांना सांगावं, जे नियमित नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावे. नाहीपेक्षा त्यांना मग मात्र दंडासह वसुली करता येईल. मागचे जे झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण”, असं छगन भुजबळ म्हणाले.