लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून काही जागांवर निर्णय झाला नाही. त्यात नाशिकमधील शिवसेनेची जागा आहे. या जागेवर एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. त्याचवेळी भाजपकडून नाशिकची जागा लढवावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. परंतु ही जागा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पाहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले आहे.
छगन भुजबळ यांनी घेतलेले हे कर्ज तब्बल 13 वर्षे जुने आहेत. भुजबळ यांनी 2011 मध्ये आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्यासाठी कर्ज घेतले होते. नाशिक जिल्हा बँकेतून हे कर्ज घेतले होते. आता हे कर्ज वन टाइम सेटलमेंट योजनेत भरले जात आहे. थकीत कर्जाचा पहिला हप्ता साडेसहा कोटी रुपये भरण्यात आला आहे. एकूण साडेसहा कोटी रुपये भुजबळ कुटुंबियांकडून भरण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेच्या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून साडेसहा कोटी रुपये भरण्यात आले. एकूण 28 कोटी कर्ज भरण्यात येणार आहे. उर्वरित कर्जाची रक्कम टप्प्याटप्प्याने भरली जाणार असल्याचे बँकेला त्यांनी सांगितले आहे. छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. ही निवडणूक लढवताना बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी कोणी तक्रार करु नये, यासाठी भुजबळ यांनी खबरदारी घेत थकीत कर्ज भरण्यास सुरवात केल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून एकीकडे शिवसेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. हेमंत गोडसे आपल्या समर्थकांसह नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. दुसरीकडे भुजबळांसाठी भाजप देखील थेट केंद्रातून प्रयत्न करत असल्याचा खुलासा स्वतः भुजबळ यांनी केला होता.