छत्रपती संभाजीनगरात आग, सात जणांचा मृत्यू, कुटुंबातील कोणीच जिवंत नाही, अंत्यविधी कोण करणार ?
chhatrapati sambhaji nagar fire: छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मृत्यू झालेले सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील छावनी परिसरात असणाऱ्या टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या अग्नितांडवात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले आहे.
धुरांचे प्रचंड लोट
आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. घरात असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यात मृत्यू झालेल्या सात जणांशिवाय एक जण मिसिंग आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मृतांमध्ये आसिम वसीम शेख, परी वसीम शेख, वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष), हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), रेशमा शेख (22 वर्ष) यांचा समावेश आहे.
#WATCH | Maharashtra: Manoj Lohiya Commissioner of Police, Aurangabad says, "At around 4 am, a fire broke out in a clothing shop in the cantonment area of Chhatrapati Sambhajinagar. The fire did not reach the second floor but after a preliminary investigation, we think seven… https://t.co/yvCkdT5QYa pic.twitter.com/LeVIrlDDWE
— ANI (@ANI) April 3, 2024
कुटुंबातील कोणीच राहिले नाही
आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आगीत संपूर्ण कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या कुटुंबातील अंत्यविधी करण्यासाठी घरातील कोणीच राहिले नाही. आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, त्याचे कारण समजू शकले नाही. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.
खासदार जलील यांचे आरोप
छत्रपती संभाजीनगर झालेल्या अग्नितांडावामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कुणाच्या चुकीमुळे 7 लोकांचे मृत्यू झाले त्याची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा आल्या, त्यांच्याकडे टॉर्च नव्हत्या, इतर साहित्य नव्हते, असे आरोप खासदार जलील यांनी केले आहे.