संभाजीनगर महापालिका निवडणुकीआधी रणनीती ठरली, महायुती आणि मविआतील ‘या’ पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, २०२५ मध्ये होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयारीत आहेत. शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, तर भाजपही स्वबळावर लढण्याचा विचार करत आहे. तसेच ठाकरे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत आहे.
लोकसभेनंतर नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप बरोबर शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळाले. आता राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक झालेली नाही. आता 2025 मध्ये महापालिका निवडणूक होईल, अशी सध्यातरी शक्यता आहे. जरी असे असले तरी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र, ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची भाषा करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली तर, भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी विधानसभेला मोठे यश मिळाल्याने आता दोघांची भाषा बदलली असून छत्रपती संभाजीनगर महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांचे वक्तव्य समोर आले आहे.
शिंदे गटाची नेमकी रणनीती काय?
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “महापालिका निवडणुकीची आमची तयारी झाली आहे, निवडणूक कधीही लागो आम्ही तयार आहोत. आमची प्रत्येक वॉर्डात संघटना बांधणी आणि तयारी आहे, आणि महापालिका जिंकण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन पूर्ण झालेले आहे. तसेच आमच्या पक्षात उबाठा गटाचे काही नगरसेवक येण्याच्या तयारीत आहेत. पण ते घेताना त्यांची क्षमता बघून आम्ही त्यांना प्रवेश देणार आहोत. भाजपने महापालिका स्वतंत्र लढावी का? हा त्यांचा प्रश्न असला तरी, जातीयवादीयांच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून आम्ही भाजपला युतीचा प्रस्ताव देणार आहोत. पण त्यांनी मान्य केले नाही तर आमची तयारी पूर्ण झालेली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपसोबत असो किंवा नसो, छत्रपती संभाजीनगर महापालिकावर भगवा झेंडा रोवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे.
भाजपची रणनीती काय?
भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनीदेखील महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आमची तयारी खूप चांगली आहे, आणि आमची तयारी बूथ पर्यंत झाली आहे. याचा फायदा महायुतीचे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना झाला. तसेच जिल्ह्यात नऊच्या नऊ उमेदवार महायुतीचे आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपची ताकद गेल्या चार वर्षात चांगली वाढली आहे, आणि म्हणून महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढली पाहिजे, अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि तशी संधी आम्ही कार्यकर्त्यांना देणार आहोत. तसेच आमचा आलेख वाढता आहे. महायुतीत आम्ही मोठे भाऊ आहोत, हे मागच्या दोन वेळा सिद्ध झालेले आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगर महापालिका स्वतंत्र लढण्यासाठी आमचे नेते चंद्रकांत बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. मात्र निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ”, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.
ठाकरे गट काय करणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या सर्व शिवसैनिक आणि नगरसेवकांचे म्हणने एकच आहे. आपण एकट्याने लढले पाहिजे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश येईल त्याप्रमाणे करू, मात्र आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे, आपण एकटेच लढू”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.