Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात अखेर जयदीप आपटेला जामीन मंजूर
Malvan Statue Collapse Case : मागच्यावर्षी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. या पुतळ्याच शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली होती.
मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुर्णाकृती पुतळ्याच अनावरण झालं होतं. पुतळा उभा राहिल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षासह चहूबाजूंनी प्रचंड टीका झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला काही दिवसांनी अटक झाली होती. या जयदीपला आपटेला आता जामीन मंजूर झाला आहे. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जयदीप आपटेला जामीन मंजूर केला.
25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायाधीश एनआर बोरकर यांनी जयदीप आपटेला जामीन मंजूर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ब्राँझपासून बनवण्यात आला होता. जयदीप आपटेने जामीन मिळवण्यासाठी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळा कोसळला असा दावा केला होता. 1 ऑक्टोंबरला ओरसच्या सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. म्हणून वकील गणेश सोवानी यांच्या माध्यमातून त्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
जयदीप आपटेच्या वकीलाने काय युक्तीवाद केला?
26 ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णकृती पुतळा कोसळला होता. 28 फुटाचा हा पुतळा 12 फुटाच्या चबुतऱ्यावर बांधण्यात आला होता. जयदीप आपटेने 2010 साली जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेमध्ये डिप्लोमाची पदवी मिळवली होती. “पुतळ्या कोसळल्यानंतर त्यात कोणीही जखमी झालं नाही. हे दुर्लक्षाच प्रकरण आहे. अजून कोठडीची आवश्यकता नाही” असा युक्तीवाद आपटेचे वकील गणेश सोवानी यांनी केला.
तक्रार कोणी नोंदवलेली?
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जयदीप आपटे विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. आरोपीवर विविध कलमं लावण्यात आली होती. जयदीप आपटेने पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.
आपटेने त्याच्या याचिकेत काय म्हटलं?
मेसर्स आर्टिस्ट्रीचा मालक जयदीप आपटेने सांगितलं की, “नौदलाच्या डॉकयार्डने 8 सप्टेंबर 2023 रोजी कार्य आदेश जारी केला. त्या आधारावर पुतळा बनवण्यात आला” नौदल डॉकयार्ड प्राधिकरणाने कुठल्याही कलात्मक कमतरतेची तक्रार केली नाही असं आपटेने त्याच्या याचिकेत म्हटलं होतं.