ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नको, त्यांच्यासाठी काय? मनोज जरांगे पाटील यांनी दिले उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी फोन आला होता. त्यांच्याशी आरक्षणावर चर्चा झाली. या चर्चेत त्यांना समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचे सांगितले. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घ्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
बीड | 31 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील मराठा समाजाच्या आग्रहानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारीपासून पाणी पिण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना आता व्यवस्थित बोलता येऊ लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांना फोन आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पुन्हा केली. कारण मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे. यापूर्वी ६० टक्के मराठा आरक्षणात गेले आहे. थोडे जे राहिले आहे, त्यांच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. ज्यांना घ्यायचे ते कुणबी प्रमाणपत्रे घेतील. ज्यांना नको असेल तर घेणार नाही. कोणाला जबरदस्ती नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
कुणबीचा अर्थच शेती
कुणबीचा दुसरा अर्थ शेती आहे. शेती शब्दाची लाज वाटण्याइतका मराठा खालच्या विचाराचा नाही. शेतीच्या आधारावर १७ ते १८ जातींना आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्याच आधारावर आम्हाला आरक्षण मिळायला हवे. आरक्षण पूर्ण घेतल्याशिवाय आपण थांबणार नाही. अर्धवट दिलेले आरक्षण जमणार नाही. त्याचे परिणाम वेगळे होतील. यासंदर्भात जीआर आम्हाला मान्य नाही, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, असे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. दरम्यान मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन घेण्यात येण्याची शक्यता आहे.
उद्रेक करु नका- मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
मराठा समाजातील तरुणांनी उद्रेक करु नका, आत्महत्या करु नका. मी सुद्धा लढतो. मी लढून येणाऱ्या मरणास घाबरणार नाही. सोमवारी केलेल्या आवाहनानंतर सगळीकडे शांततेत आंदोलन सुरु आहे. कालपासून कुठेही हिंसाचार झालेला नाही. मराठा समाजाचे आंदोलन दोन टप्प्यांत सुरु आहे. साखळी उपोषण गावागावात सुरु आहे. राजकीय नेत्यांना आपल्या गावात येऊ द्यायचे नाही, हा दुसरा टप्पा आहे. मी समाजाच्या आग्रहानंतर पाणी घेत आहे. त्यानंतर मी उठून बसलो आहे. यामुळे मराठा समाजातील तरुणांनी शांततेने आंदोलन करावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.