‘तो’ व्हिडिओ डिलीट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव? देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं ?
राज्यातील राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भाजप पक्षाच्या ट्वीटर हॅंडलवरुन देवेंद्र फडणवीस यांचा, 'मी पुन्हा येईन', हा व्हिडीओ प्रसारीत झाल्याने वातावरण ढवळले आहे. यावर हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांनी डीलिट करायला सांगितला का ? यावर टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखती काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहा
मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : राज्यातीलअपात्र आमदाराच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी प्रलंबित असतानाच काल सायंकाळी भाजपा पक्षाच्या ट्वीटर हॅंडरवरून देवेंद्र फडणवीस यांचा, ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडीओ पोस्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळले आहे. यासंदर्भात विविध तर्कवितर्क लढविले जात असताना भाजपकडूनच हा व्हिडीओ अचानक डीलिट करण्यात आल्याने आणखीन भुवया उंचावल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी स्फोटक मुलाखत घेतली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा व्हिडीओ डिलिट करण्यासाठी दबाव आला काय ? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले पाहा.
मी पुन्हा येईल असा कसा प्ले झाला …
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भाजप पक्षाच्या ट्वीटर हॅंडलवरुन देवेंद्र फडणवीस यांचा, मी पुन्हा येईन, हा व्हिडीओ प्रसारीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळले असताना हा व्हिडीओ कसा प्ले झाला या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ,मला आश्चर्य वाटतं की एवढी बौद्धिक दिवाळखोरी का असावी? लोक सातत्याने कंटेट शेअर करत असतात. सोशल मीडियावर जुने कंटेट शेअर करावे लागतात. तशा प्रकारे तो शेअर केला गेला असावा. तो शेअर करण्याची गरज नव्हती. ज्यांनी केलं. त्याच्यापैकी ज्यांना कळत नाही त्यांनी शेअर केला. अशा प्रकारे व्हिडीओ शेअर केल्यानंतर राज्यात सत्ता बदल होणार आहे का ? मी बौद्धिक दिवाळखोरी म्हटलं ती या अर्थाने की कुणाला जर सत्तेवर यायचं असेल तर तो अशा प्रकारे व्हिडीओ शेअर करुन येतो का ?. असा अनाऊंसमेंट करून येतो का असाही सवाल फडणवीस यांनी केला.
भाजपाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडल वरुन हा व्हिडीओ शेअर झाला आहे ? असा प्रश्न विचारताच फडणवीस म्हणाले की मला एवढं सांगा. भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडल आहे हे मान्य, पण सत्ताबदल करायचा असेल तर ट्विटर हँडलवरुन करता येईल का.? मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो. राज्यात महायुती सत्तेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांची पूर्ण टर्म ते पूर्ण करतील. एकही दिवस ते हटणार नाहीत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि आम्ही निवडणूक जिंकू. त्यामुळे कुणाच्या मनात शंका घेण्याचं कारणच नाही. म्हणून अशा प्रकारच्या व्हिडिओचा वेगळा अर्थ काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिलीट केल्याने मुख्यमंत्र्यांकडून दबाव आला का ?
हा व्हिडीओ प्रसारीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तुमच्यावर दबाव आला काय ? प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांना राजकीय परिस्थितीचे भान आहे. आमचा संवाद चांगला आहे. अशा एका व्हिडीओमुळे ते डिस्टर्ब होतील आणि फोन करतील एवढे अपरिपक्व ते नाहीत. ते अतिशय परिपक्व आहे. काही लोकांनी जाणीवपूर्वक खेळ करण्याचा प्रयत्न केला. ज्या विषयाची काहीच गरज नाही ते विषय चालू द्यावेत अशी राजकीय परिस्थिती नाही. मी विचारलं काय घडलं. मला सांगितलं असा असा व्हिडीओ टाकला. मी म्हटलं टाकला तर डीलिट करा असे त्यांनी सांगत या विषयावर पडदा टाकला.