Uddhav Thackeray | भोंगेधारी, पुंगीधारी खूप होतात, राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचे आसूड
काही गोष्टी आता बोलणार नाही. 14 तारखेला बोलणार. जन्मापासून काही लोकं झेंडेधारी आहेत. त्यांना अस्तित्व दाखवण्याची गरज आहे. अस्तित्व टिकवणं वेगळं. अस्तित्व दाखवणं हा त्यांचा हक्क, अशी धारदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबईः असले भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितलेत. महाराष्ट्राची जनता आता सगळ्यांना चांगलीच ओळखून आहे. हिंदू काही एवढे नासमज नाहीयेत. त्यामुळे या सगळ्याकडे आपण फक्त मनोरंजन म्हणून पाहिलं पाहिजे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केली. हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांनी राज्यभरात नवी लाट निर्माण केली आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील भिन्न- भिन्न विचारसरणीच्या पक्षांमध्ये शिवसेनेचं हिंदुत्व (Hindutwa) नष्ट झाल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. दै. लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर ही टीका केली.
फुकट करमणूक होत असेल तर का नको?
हिंदुत्ववादाची भूमिका घेत एक वेगळा पक्ष आक्रमक होतोय, याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात, हे अनुभवलेलं आहे. कधी मराठीचा कधी हिंदुत्वाचा खेळ. डोंबाऱ्यांचा मी अपमान करू इच्छित नाही, पण महाराष्ट्राचे लोक असे खेळ पहात आलेले आहेत. दोन वर्षाच्या कालखंडात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. मग फुकट अशा प्रकारची करमणूक करून मिळत असेल तर का नाही पहायची?
‘असे भोंगेधारी पुंगीधारी खूप बघितलेत’
आम्ही हिंदुत्ववादी पक्ष असल्याची ओळख सांगण्याची गरज नाही. आमचा पक्ष हिंदुत्ववादी आहेच. पण आता मार्केटिंगचा जमाना आहे, त्यामुळे हे सगळं सुरु आहे. पटलं तर पटलं. नाही पटलं तर नाही. म्हणजे गाजराची पुंगी. वाजली तर वाजली. असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितलेत.महाराष्ट्राची जनता आता सुजाण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
‘हिंदुत्वाचा डंका आम्हाला वाजवाला लागत नाही’
हिंदुत्वाचा डंका पिटून काहीजण माकडचाळे करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली. ते म्हणाले , ‘ हिंदू आणि हिंदुत्वाला एवढं असमर्थ समजू नका. ते देशातून परके नाहीत. काहीजण हिंदी, बंगाली बोलतात. पण आम्ही मराठी म्हणायचं आणि बाकिच्यांना हाकलून लावायचं. मग हिंदू हिंदू म्हणायचं. हे जे माकडचाळे चालतात नं.. हे हिंदुत्वाचेदावेदार वगैरे होऊ शकत नाहीत. आपल्या देशातली जनता नासमज नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्हाला डंका वाजवावा लागत नाही. तुमच्या वागणुकीत असं काय आहे की, तुम्हाला सांगावं लागतं.. तुम्हाला तुमची नवनवीन ओळख झेंडे फडकावे लागतात. कधी या रंगाचा कधी त्या रंगाचा आम्ही कधीच झेंडा बदलला नाही. काही गोष्टी आता बोलणार नाही. 14 तारखेला बोलणार. जन्मापासून काही लोकं झेंडेधारी आहेत. त्यांना अस्तित्व दाखवण्याची गरज आहे. अस्तित्व टिकवणं वेगळं. अस्तित्व दाखवणं हा त्यांचा हक्क, अशी धारदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.