Chnadrakant Patil: …तरीही चंद्रकांत पाटील म्हणतात, शिवसेनेतील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही; मोहित कंबोजांचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध
भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली जाते.
मुंबईः शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP MLA Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील घडणाऱ्या घटनांविषयी आणि भाजपचा (BJP) जोडला गेलेला संबंध चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूरात पत्रकारांनी त्यांना मोहित कंबोज आणि संजय कुटे यांच्या सूरत ते गुवाहाटी प्रवासाबद्दल विचारले असता त्यांनी त्यांच्याबद्दल सांगितले की, या दोघांचे राजकारणातील अनेकांशी त्यांचे मैत्रपूर्ण संबंध असल्याचे सांगत त्या मित्रत्वामुळेच ते त्या ठिकाणी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यांनी सांगितले की, भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली जाते, त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य
शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात.
अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, याची त्यांनी पत्रकारांना आठवणही करून दिली.
मोहित कंबोज यांचे मैत्रपूर्ण संबंध
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपचे मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटे यांच्या सहभागाविषयी आणि सुरतपासून ते गुवाहाटीपर्यंत तुमच्यासोबत कसे या प्रश्नावर छेडले असता त्यांनी सांगितले की, मोहित कंबोज आणि संजय कुटे यांचे अनेक पक्षातील नेत्यांबरोबर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगून त्यांनी मोहित कंबोज आणि संजय कुटे या प्रश्नावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला.