विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा, प्रचार रॅलीवर दगडफेक
माझे विरोधक हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे. स्वतः दहशत माजवतात. 2004 साली माझ्यावर देखील असाच हल्ला करण्यात आला होता अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दिली. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिलीप सोपल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता दोन दिवस राहिले आहे. प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी रॅली काढत आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना प्रचार रॅलीत राडा झाला. बार्शीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाली. ही दगडफेक शिवसेना उबाठाकडून झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे. या दगडफेकीमध्ये रॅलीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत. रॅलीवर दगडफेक केल्याप्रकरणी कृष्णा राजपूत, प्रशांत जाधव, संपत जाधव, शिवाजी जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या गल्लीत रॅली काढायची नाही, हा इलाका आमच्या मालकीचा आहे, असे आरोप म्हणत आरोपींना वाद घातला. तसेच आरोपी शिवाजी जाधव आणि प्रशांत जाधव यांनी रॅलीवर विटा फेकून मारल्याची नोंद पोलिसांच्या तक्रारीत आहे.
ही दगडफेक बनावट- शिवसेना उबाठा
माझे विरोधक हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे. स्वतः दहशत माजवतात. 2004 साली माझ्यावर देखील असाच हल्ला करण्यात आला होता अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दिली. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिलीप सोपल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ते म्हणाले, ही दगडफेक बनावट असून हा वाद व्यक्तिगत वादातून झालेला आहे. मुळात त्या पदयात्रेला परवानगी नव्हती, अशी माझी माहिती आहे. मात्र राजेंद्र राऊत हे नेहमीप्रमाणे माझ्यावर खोटे आरोप करतात असा आरोप दिलीप सोपल यांनी केला. दिलीप सोपल हे राष्ट्रवादीत होते. परंतु निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम 118 (1), 125 अ, 115 (2), 352, 351 (2-3), कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.