मुंबई, पुणे शहरात वातावरण बदल, ढगाळ वातावरणाबरोबर पावसाचा शिडकावा
unseasonal rain in maharashtra | गेल्या दोन दिवसांपूर्वी विदर्भ आणि खान्देशात गारांचा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. आता पुणे-मुंबईसह राज्यातील इतर भागांत वातावण बदलले आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.
मुंबई, पुणे | दि. 1 मार्च 2024 : राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. पुणे, मुंबई शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शहरातील काही भागांत पावसाचा शिडकावा झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट दिला आहे. त्यात जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे. त्यानंतर दोन मार्च रोजी जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तीन मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.
मुंबईत थंडी गायब
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी मुंबईत कमाल तापमानाने ३५ ते ३७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ४ अंशांहून अधिक होते. पुढील २४ तासांत पारा असाच राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात पुढील २४ तासांत दुपारी किंवा संध्याकाळी वातावरण अंशत: ढगाळ असेल. तसेच कमाल तापमान ३७ व किमान तापमान २४ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासांत ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ३३ व किमान तापमान २२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात ढगाळ वातावरण
पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार आहे. पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर अजून हलका पावसाची शक्यता आहे. काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि खान्देशात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. या ठिकाणी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानंतर पंचनामे सुरु झाले असून नुकसानीची आकडेवारी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे.