अकोला जिल्ह्यातल्या तेल्हाऱ्यात कडकडीत बंद; गोरक्षरकांवर गुन्हे दाखल केल्याने विहिंप, बजरंग दल आक्रमक
तेल्हारा येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पुकारलेल्या आंदोलनाला शहरातल्या नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. सध्या शहरात शांतता आहे. कुठेही तणावाचे वातावरण नाही.
अकोलाः अकोला (Akola) जिल्ह्यातल्या तेल्हारा गावात आज सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. गावात अक्षरशः लॉकडाउन सदृश परिस्थिती आहे. पोलिसांनी समाजकंटकावर थातूरमातूर कारवाई केली, पण गोरक्षकांवर गुन्हे दाखल केले, असा आरोप करत हे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, दानापूर शेत शिवारात 10 एप्रिल रोजी रात्री 2 ते 3 च्या सुमारास 40 गोवंश संशयास्पदस्थितीत जाताना दिसले. याबाबतची माहिती शेतकरी व गोरक्षकांनी पोलिसांना दिली. पोलिस गोवंश ताब्यात घेऊन हिवरखेडला जात असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला करून गोवंश पसार केले. याप्रकरणी पोलिसांनी काही समाजकंटकांवर कारवाई केली. मात्र, गोरक्षकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. हा अन्याय असल्याचा आरोप करत तेल्हारा तालुका बंद करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने (Bajrang Dal) केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळला आहे.
शहरात सध्या शांतता
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पुकारलेल्या आंदोलनाला शहरातल्या नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. सध्या शहरात शांतता आहे. कुठेही तणावाचे वातावरण नाही. दरम्यान, पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या कृत्याचा आज निषेध करण्यात आला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा येथे आज बंद आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथेही आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय. दोन्ही ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या ठिकाणी शांतता ठेवण्याचे आणि आंदोलनाला कसलेही गालबोट लागू न देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अशी प्रकरणे चर्चेतून आणि सामंजस्याने मिटवण्यावर भर दिल्यास त्यांचे लोण जास्त पसरू शकणार नाही. याची दक्षता घेण्याची गरज व्यक्त होतेय. इतर बातम्याः