मुख्यमंत्र्यांकडून बीड आणि परभणी प्रकरणात संवेदनशीलतेचं दर्शन, देशमुख आणि वाकोडे कुटुंबियांना सर्वात मोठा दिलासा
बीडच्या मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं आहे. देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासनात सामावून घेण्याचा म्हणजेच सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय परभणीचे विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांबाबतही घेतला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये बीड आणि परभणी प्रकरणांमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या दोन्ही घटनेतील पीडित कुटुंबियांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. देशमुख यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं आहे. देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासनात सामावून घेण्याचा म्हणजेच सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे देशमुख यांची मुलं लहान असल्याने संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन संवेदनशीलतेचं दर्शन घडवून दिलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पडलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांबाबतही असाच निर्णय घेतला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
“विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते. दुर्दैवाने त्यांचा जो अंत झाला आहे, परभणीत जे वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीत त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सभागृहात सांगितलं होतं. अधिवेशन संपल्यानंतर मी स्वत: परभणीला गेलो होतो. परभणीला विजय बाबांच्या घरी गेल्यानंतर सर्व कुटुंबियांना विनंती केली होती की, आपण सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत यावं. मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो. तिथले माजी आमदार सुरेश देशमुख, माजी महापौर सोनकांबळे, विजय वाकोडे यांचे थोरले आणि धाकटे चिरंजीव सर्वजण आले”, असं सुरेश धस यांनी सांगितलं.
“विजय वाकोडे यांचा एक मुलगा शासनानात घेण्याबाबतचा निर्णय झाला. तसेच ज्या ठिकाणी आंदोलन झालं ते स्थळ स्मृतीस्थळ होईल. विजय बाबांच्या अंत्यंविधीच्या ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेला आहे तिथे स्मृतीस्थळ होईल. असे दोन्ही आश्वासन वाकोडे कुटुंबियांना दिले आहेत. जे फक्त अॅक्शन मोडमध्ये आंदोलक तरुण होते त्यांच्यावर कारवाई होईल. इतरांवर जे नोकरीस प्राप्त आहेत ते सर्व चार्जशीटमधून वगळण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे”, अशी महत्त्वाची माहिती सुरेश धस यांनी दिली.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबाबत निर्णय काय?
“संतोष देशमुख यांच्या पत्नीला लातूर जिल्ह्यात शासनात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण संतोष देशमुख यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे”, अशी महत्त्वाची माहिती सुरेश धस यांनी दिली. “एसआयटीमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांत एसआयटीत बदल झालेला दिसेल”, अशी देखील माहिती सुरेश धस यांनी दिली.