मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते, पण ते…
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणासही सोडले जाणार नाही, मग तो कितीहीमोठा असा इशारा दिला होता आणि तो इशारा अखेर खराच निघाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडानंतर या घटनेच्या जवळपास तीन महिन्यानंतर या घटनेचे फोटो व्हायरल झाल्याने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडाचे ८ व्हिडीओ आणि १५ फोटो आरोपपत्रामुळे व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेत मंत्री धनंजय मुंडे हे सुरुवातीपासून वाल्मीक कराड आपले जवळचे मित्र आहेत. परंतू या घटनेशी आपला काही संबंध नाही असे पालूपद त्यांनी सुरुवातीपासूनच लावले होते. परंतू अखेर त्यांना राजीनामा द्यावाच लागला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीमान्याचा घटनाक्रम कसा घडला हे पाहणे देखील महत्वाचे आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या १० डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. त्याआधी नऊ तारखेला त्यांचे अपहरण झाले होते. त्यानंतर खंडणीच्या वादातून त्यांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेचा साद्यंत वृत्तांत बीडचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात सांगितला होता. आणि सुरुवातीपासून ते या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे थेट नाव न घेता ‘आका’ आणि ‘आका’ का आका असा उल्लेख करीत होते. अप्रत्यक्षपणे ते धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव घेत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. त्यांनी यापूर्वी तीन ते चार वेळा अजितदादांशी या विषयावर चर्चा केली होती. आणि स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. परंतू, धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. शेवटी एका क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की,जर तुम्ही राजीनामा देणार नसाल,तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल अशा इशारा दिला होता. या इशार्यानंतर वातावरण बदलल्याचे म्हटले जात आहे.




उद्याच्या उद्या राजीनामा द्या
काल पुन्हा धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनी उद्याच्या उद्या राजीनामा द्या असे सांगितले आणि आज सकाळी मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती,अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणूनच एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते.