बीड सरपंच हत्या प्रकरणात अतिशय मोठ्या घडामोडी, मुख्यमंत्र्यांचा SP, CID ला फोन, नंतर हालचाली वाढल्या
बीड सरपंच हत्या प्रकरणात आज मोठ्या घडामोडी घडल्या. धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती करण्यासाठी स्वत: बीडचे एसपी नवनीत कॉवत हे देखील घटनास्थळी पोहोचले होते. चार तास चाललेल्या त्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांसोबत फोनवर बातचित केली. यानंतर घडामोडी वाढल्या आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा, सर्व आरोपींना अटक व्हावी आणि तपासाची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावात आंदोलन केलं. त्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर बातचित करत या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याचा आढावा घेतला. यावेळी तपासामध्ये कुणालाही दयामया दाखवू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कुणावरही दयामया दाखवू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज सकाळी केलेले आंदोलन जवळपास चार तास चाललं. त्यांनी पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरावं यासाठी डीवायएसपी, एसपी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रकरणात तपास कुठपर्यंत झाला? याची माहिती धनंजय देशमुख यांना हवी आहे. अखेर त्यांना तपासाची माहिती दिली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर ते टाकीवरुन खाली उतरले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत सीआयडी आणि एसपींसोबत फोनवर बातचित केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा छडा लवकराच लवकर लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची शक्यता आहे.
एसआयटी आजच घेणार देशमुख कुटुंबियांची भेट
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर आज संध्याकाळी हालचाली वाढल्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडी अधिकारी सचिन पाटील हे आज संध्याकाळीच देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत. ते केज येथील शासकीय विश्रामगृहात आज संध्याकाळी देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत. यावेळी ते देशमुख कुटुंबियांना तपासाची माहिती देण्याची शक्यता आहे. धनंजय देशमुख दोन दिवसांपासून तपासाची माहिती द्या, अशी मागणी करत आहे. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी आज केलेल्या आंदोलनानंतर देशमुख कुटुंबीय आणि SIT च्या पथकाची महत्त्वपूर्ण भेट होत आहे.
घडामोडी वाढल्या
दरम्यान, SIT पथकाच्या भेटीचा निरोप घेऊन केज पोलीस मस्साजोग येथे दाखल झाले. थोड्या वेळात देशमुख कुटुंबीय आणि SIT च्या पथकाची केजच्या शासकीय विश्रामगृहात भेट होणार असल्याची माहिती आहे. केज पोलीस देशमुख कुटुंबीयांना भेटीसाठी मस्साजोगवरून केजला सोबत घेऊन जाणार असल्याचीदेखील माहिती आहे.