मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट, फडणवीसांना खरंच जेलमध्ये टाकणार होते? काय-काय घडलं?
"भाजपच्या चार-पाच लोकांना जेलमध्ये टाकण्याचा सगळा प्लॅन तयार झाला होता. असं कसं होऊ शकतं? लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळा प्लॅन तयार होता. अर्थात मी तिकडे असल्यामुळे मला हे सगळं माहिती होतं", असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार होते. त्यामुळे महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला”, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. “महाविकास आघाडी काळात देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्लॅन होता”, असा गौप्यस्फोटदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. “खेळण्याला चावी दिली जाते. चावी संपेपर्यंत बोलावे लागते”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. तर “मविआ काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
“भाजपच्या चार-पाच लोकांना जेलमध्ये टाकण्याचा सगळा प्लॅन तयार झाला होता. असं कसं होऊ शकतं? लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळा प्लॅन तयार होता. अर्थात मी तिकडे असल्यामुळे मला हे सगळं माहिती होतं. मी म्हणालो, आता जास्त वेळ काढला तर आपलं चपट होईल. त्यामुळे आपण यांचंच चपट करुन टाकूया आणि टांगा पलटी करुन टाकला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलं बोलले आहेत. एक चावीचं खेळणं असतं, रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत त्यांना बोलावं लागतं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“त्यांनी मला कुठल्यातरी केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न खूप केला. त्यांनी माझ्या केसापासून नखापर्यंत चौकशा केल्या. पण त्यांना काहीच मिळालं नाही. खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला. त्याकरता एक पोलीस आयुक्त आणून बसवला. पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिलीय. “देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षातीन नेत्यांचे, आपल्या सहकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. हा गुन्हा आहे. त्याची चौकशी सुरु होती. तुम्ही थांबवलीत का? आपल्याला अटक होईल या प्रकरणात, आपल्याला तुरुंगात जावं लागेल, या भीतीने त्यांनी एकनाथ शिंदेंना धमकावलं आणि मग त्या माध्यमातून सरकार पाडलं. आमचं सरकार येऊद्या मग बघू. त्यांनी जी चौकशी थांबवली आहे ती परत सुरु होईल”, असं संजय राऊत म्हणाले.