एकनाथ शिंदे यांचा मोठा गेम प्लॅन, उद्धव ठाकरे यांना असा देणार ‘झटका’
'मिंदे आणि भाजपने दर आठवड्यात एक एक माणूस फोडावा. जे बिनकामाचे लोक होते ते गेले. मिंदे गटाला धन्यवाद देतो. तुम्ही असेच एक एक जण फोडण्याचे काम करत रहा, त्यामुळे शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहील',असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुंबई । 29 जुलै 2023 : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि निटकवर्तीय समजले जाणारे एकेक सहकारी पक्ष सोडून जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपला सोबत घेतले. त्याचवेळी १३ खासदार, ४० आमदार, मुंबई ठाणे जिल्ह्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या गटांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. तर, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाने केलेली मुख्य प्रतोदपदाची नेमणूक ही अयोग्य असल्याचे सांगत ठाकरे गटाला दिलासा दिला.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत होता. तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहीसा मंदावला होता. परंतु, हा ओघ आता पुन्हा वाढला असला तरी तो एकनाथ शिंदे यांचाच मास्टर प्लॅन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
विधान परिषदेतील आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे, महापालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि काल मंगेश सातमकर यांनी एकापाठोपाठ एक असा शिंदे गटात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या सायन, अँटॉप हिल विभागातील शिवसैनिक पोहोचले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला. जे लोक पक्ष सोडून गेले आहेत त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’ असे ते म्हणाले.
‘मिंदे आणि भाजपने दर आठवड्यात एक एक माणूस फोडावा. जे बिनकामाचे लोक होते ते गेले. मिंदे गटाला धन्यवाद देतो. तुम्ही असेच एक एक जण फोडण्याचे काम करत रहा, त्यामुळे शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहील’,असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आणखी काही पदाधिकारी, माजी नगरसेवक हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मात्र, त्यांना सरसकट प्रवेश न देता एकेक करून पक्षात घेण्याचे धोरण शिंदे गटाने ठरविले आहे. यामागे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्यांचे मनोधर्य कमी करणे हाच उद्देश आहे. आपले पुढे काय होणार याची धास्ती असलेल्या उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाचे पदाधिकारी संपर्क साधत आहेत. यातून आणखी काही नगरसेवक त्यांच्या गळाला लागले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.