मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पुतळा कोसळ्याची घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा उंच असा भव्य पुतळा मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आहे. त्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय. ज्या शिवाजी महाराजांनी अभेद्य असे किल्ले बांधले, विशेष म्हणजे समुद्रात किल्ला बांधला त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने संताप व्यक्त केला जातोय. या घटनेवरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“झालेली घटना ही दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याचं कम्पलिट डिझाईन नेवीने तयार केलं होतं. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी गेले आहेत. मी त्यांना सूचना केलेल्या आहेत. उद्या तात्काळ नेवीचे अधिकारी आणि आमचे अधिकारी हे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं पुन्हा काम करतील”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आमदार वैभव नाईक यांनी या घटनेनंतर मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ठीक आहे. शेवटी भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. पण कायदा हातात घ्यायची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहीजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया
छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. “पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला, घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.