‘बंडखोरी करु नका’, एकनाथ शिंदे यांचं आवाहन, नाराज नेते पक्षादेश ऐकणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना अतिशय मोलाचं आवाहन केलं आहे. शिवसेना पक्षाच्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. या खासदारांना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी न करण्याचं आणि युती धर्म पाळण्याचं आवाहन केलं आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. विशेष म्हणजे जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विद्यमान खासदारांना डच्चू दिला जाताना दिसतोय. शिंदे गटाकडून गेल्या आठवड्यात 8 उमेदवारांची नावे जाहीर झाली. यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवार झाली होती. पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यांच्याऐवजी शिवसेना नेते बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम राहिला. शेवटच्या दिवशी वाशिम-यवतमाळचा उमेदवार जाहीर झाला.
विशेष म्हणजे वाशिम-यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेऊन चर्चा केली. पण त्यांना अखेर उमेदवारी मिळालीच नाही. शिंदेंनी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी दिली.
शिवसेनेच्या हातून नाशिकची जागा सुटणार?
यवतमाळ-वाशिमच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर त्या उमेदवाराचा अर्ज भरण्यात आला. यावेळी शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: सभेला उपस्थित होते. पण या सभेला भावना गवळी उपस्थित नव्हत्या. भावना गवळी या तिकीट कापल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी माध्यमांसमोर येऊन अद्याप भूमिका दिलेली नाही. याशिवाय नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारीसुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून ही जागाही सुटण्याची शक्यता आहे.
शिंदेंना संभाव्य धोक्याची जाणीव?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या पाच विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी बंडखोरी करुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांच्यापुढे आता पक्षाच्या नेत्यांचं बंड उभं राहिलं तर ते शमवण्याचं आव्हान असणार आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय आवाहन केलंय?
वाशिम, हिंगोली, रामटेक लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. बंडखोरी करु नका. युती धर्म पाळा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे. ज्यांचा पत्ता कट झालाय त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच ज्या खासदारांचा पत्ता कट झालाय त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.