मुंबईः दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीतील छायाचित्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शेवटच्या रांगेत उभे असल्यावरून विविध राजकीय पक्षांची टीका होत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनीही एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी हा मान टिकवून ठेवावा, राज्याचा अवमान होता कामा नये, असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राजधानी दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. याच बैठकीचा एक फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरतोय. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील रांगेत उभे आहेत.
सचिन खरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय. ते म्हणालेत, ‘ माननीय मुख्यमंत्री आपण भारत देशाला हिमालय म्हणतो आणि महाराष्ट्र राज्याला सह्याद्री म्हणतो आणि ज्यावेळेस हिमालयावर संकट येतं त्यावेळेस सह्याद्री मदतीला पुढे जातो. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्यानात ठेवावं. कारण कालच्या नीती आयोगाच्या बैठकीचे फोटो पाहिले या फोटोत आपण मागे दिसला माननीय मुख्यमंत्री आपण राज्याचा अभ्यास करा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आदरणीय शरद पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्र राज्याची मान कायम उंचावली आणि त्यांनासुद्धा त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचा आदर राखला गेला हे तुम्हाला माहित नसेल तर माहिती करून घ्यावी आणि यापुढे महाराष्ट्र राज्याचा अपमान होणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्री यांनी घ्यावी.
सदर फोटोवर एकनाथ शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला उभे होते. पण ते कुणाला दिसलं नाही. केवळ राजकारणासाठी विरोध करण्यात अर्थ नाही, असं उदय सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज गेले, तेव्हा त्यांना दुसऱ्या रांगेत उभे केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सभा सोडली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्र किती झुकलाय, हे पहायला मिळत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.