मंत्री तानाजी सावंत यांच्या शेतकरी मेळाव्यात शिंदेंचा फोटो बॅनरवरुन गायब, शिवसैनिक नाराज
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या शेतकरी मेळाव्याच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. मंत्री सावंत यांच्यामुळे धाराशिव जिल्ह्यात गटबाजी झाल्याचा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अमर राजे कदम यांचा आरोप आहे.
आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रमाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नसल्याने धाराशिव जिल्ह्यात काही शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक यांच्यामध्ये नाराजी असल्याचं दिसलं. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे आज आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या तेरणा कारखान्यावरती शेतकरी संवाद मेळावा पार पडला. त्या मेळाव्याचे बॅनर धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या बॅनरवरती शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप असा उल्लेख असला तरी मुख्यमंत्र्याचा फोटो मात्र या बॅनरवरून गायब झाल्याचे दिसत आहे. तुम्ही शिवसेना लिहित आहात, मग मुख्यमंत्री यांचा फोटो का बॅनरवरती नाही? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी यांनी उपस्थित केलाय.
मंत्री सावंत यांच्यामुळेच धाराशिव जिल्ह्यात गटबाजी निर्माण झाली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रन नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे.
आरोग्यमंत्री सावंत हे कुठल्याच कार्यक्रमाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देत नाहीत. फक्त ठराविकच पदाधिकारी सोबत घेत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हासहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी केलाय. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत झालेली गटबाजी आम्ही लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरती घालणार असल्याचेही कदम यांनी सांगितलं आहे.