सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार नाहीतच?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालन्यातील अंतरवली सराटी गावात जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील, अशी चर्चा रंगलेली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.
मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात अशी त्यांची मागणी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. याआधी सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलेलं नाही. त्यानंतर सरकारने एक समिती नेमली. या समितीला तीन महिन्यांचा कालावधी दिला. पण तीन महिन्यांच्या कालावधीनंतरही या समितीकडून अहवाल न आल्याने मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मनधरणीचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वी एक जीआरही काढला होता. पण या जीआरमध्ये मनोज जरांगे यांनी दुरुस्ती सुचवली होती. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चाही पार पडली. पण मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यात सरकार आतापर्यंत अपयशी ठरलंय. विशेष म्हणजे जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकही बोलावली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा, असं सर्वांचं मत ठरलं.
सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनीदेखील एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला. आपण सरकारला एक महिना वेळ द्यायला तयार आहोत, असं मनोज जरांगे यांनी सरकारला म्हटलं. आपण उपोषण मागे घेऊ, पण उपोषणस्थळी आंदोलन महिनाभर सुरुच राहील, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. याशिवाय जरांगे यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारकडे पाच अटी ठेवल्या आहेत.
यापैकी एक अट ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण सोडवण्यासाठी यावं. त्यांच्यासमोर आपण उपोषण सोडू, असं जरांगे पाटील यांनी काल जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार का? अशी चर्चा रंगली होती.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी पाच वाजता मनोज जरांगे यांच्या भेटीला जातील, अशी चर्चा सुरु होती. पण मुख्यमंत्र्यांनी आज तरी मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. आपलं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
“मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणत्याही जातीवर अन्याय न करता मराठा आरक्षणाला आधी जसं आरक्षण मिळालं होतं, तसंच आरक्षण मराठा समाजाला मिळायला हवं. त्यासाठी सरकार गंभीरतेने काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सरकार नक्कीच करेल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरु आहे. आमचं शिष्टमंडळ काल तिथेच होतं. तसेच आजही तिथे जाणार आहे. त्यांच्याशी सर्व सविस्तर चर्चा झाल्यानंतर जालन्यात जाण्याबाबत निर्णय घेईन. आमचे मंत्री कालही तिकडे होते. ते आजही जरांगे यांच्या भेटीला जातील. जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. त्यांची काल माझ्यासोबतही चर्चा झाली होती. मनोज जरांगे यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी तांत्रिक बाबी समजून घेतल्या आहेत. आमचे लोक आज पुन्हा त्यांच्यासोबत बोलतील. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“हा मराठा समाजाचा आणि संपूर्ण राज्याचा समाजिक प्रश्न आहे. त्यामुळे याचं कोणीही राजकारण करु नये. कारण हा मराठा तरुणांच्या जीवाचा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांच्या जीवाची पर्वा सरकार आणि सर्वांना आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील घडली. आतापर्यंतच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं. या बैठकीतले मुद्दे विरोधाभासाचे असता कामा नये. कारण या बैठकीत सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतील. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कुणीही घेऊ नये”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.