सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द, नवा उमेदवार घोषित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदारांनी विरोध केला होता. अखेर भाजपच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. शिवसेनेकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विरोध केला होता. अखेर भाजपच्या दबावानंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून पहिल्यांदाच अशाप्रकारे जाहीर झालेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल दिवसभरात प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या. हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती. पण हिंगोलीच्या भाजप आमदाराने त्यांच्या उमेदवारीला विरोध केलाय त्यामुळे ते सु्द्धा चिंतेत आहेत. तर नाशिकच्या जागेवर आधी भाजप आणि आता राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली होती. अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
हेमंत पाटील यांचं मुंबईत शक्ती प्रदर्शन
दरम्यान, हेमंत पाटील यांना त्यांची उमेदवारी रद्द होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुंबईत आले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली होती. वर्षा बंगल्यावर अनेक तास चर्चा पार पडली होती. हेमंत पाटील आपली बाजू ठामपणे मांडत होते. पण भाजपच्या दबावामुळे शिवसेनेला हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हेमंत पाटील या निर्णयाला मान्य करत नव्हते. अखेर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील यांना त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी दिली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर ते रात्री दोन वाजेच्या सुमारास वर्षा बंगल्यातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळमधून उमेदवारी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असली तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत जवळपास निश्चत झाल्याची माहिती समोर येत आहे. पण या निर्णायामुळे खासदार भावना गवळी यांना मोठा राजकीय धक्का बसणार आहे. कारण भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार आहे. सूत्रांची ही माहिती खरी ठरली तर भावना गवळी काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हिंगोलीच नवे उमेदवार कोण?
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव कदम कोहळीकर यांचं नाव हिंगोलीसाठी जवळपास निश्चित झालं आहे.
- शिवसेनेकडून 2014 ला हदगांव हिमायत नगरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
- बाबुराव कदम कोहळीकर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत बंडखोरी केली होती. त्यांनी बंडखोरी करत हदगांव हिमायत नगरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती.
- बाबुराव कदम हे शिवसेना नांदेड जिल्ह्याचे 5 वर्ष जिल्हाप्रमुख होते.
- बाबुराव कदम कोहळीकर सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारे कोहळीकर हे दोन नंबरला लीडला होते.