एकनाथ शिंदे ऑन अॅक्शन मोड, शिवसेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर सर्वात मोठी कारवाई
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. दोन दिवसांनी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पण त्याआधी राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाध्यक्षांवर मोठी कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल शरद सोनवणे यांची शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्र दिले आहे.
बुलढाण्यात अजित पवार गटाचा ‘त्या’ पत्रावर खुलासा
दरम्यान, बुलढाणा येथून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बुलढाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मैत्रीपूर्ण लढतीतील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र जिल्ह्यात वायरल झाले होते. या पत्रावर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी खुलासा केला आहे. हे पत्र खोटे असून मतदारामध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न आहे, असं काझी यांनी स्पष्ट केलं. खोट्या अफवा आणि खोट्या पत्रावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केले आहे. दरम्यान, व्हायरल पत्रात अजित पवार गटाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. पण हे पत्र खोटे आणि चुकीचे असल्याचा खुलासा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
भाजप उमेदवाराच्या प्रचाराची रिक्षा फोडली
धुळे ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम भदाणे यांची प्रचाराची रिक्षा अज्ञात व्यक्तीने फोडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना ही वडजाई गावी रात्री घडली. राम मदने यांच्या प्रचाराची रिक्षा वडई गावातील व्यक्तीची होती. घराजवळ रात्री रिक्षा लावली असताना अज्ञात व्यक्तींनी गाडीची काच फोडली. हल्लेखोरांनी गाडीच्या डिझेलच्या टाकीमध्ये चहा पावडर आणि साखर टाकली. तसेच राम भदाणे यांचे लावलेले पोस्टरही फाडले. ही घटना सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी सकाळी पोलिसांनी पाहणी केली असून मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी रिक्षा चालक दाखल झालाय. तोडफोड करण्यात आलेली रिक्षा ही दीपक पाटील या रिक्षा चालकाची होती.