Restaurant | रेस्टॉरंट ऑक्टोबरपासून पुन्हा उघडण्याची चिन्हं, मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्सची ‘रेसिपी’
सर्व आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : राज्यातील रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, नागपूरमधील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. (CM Uddhav Thackeray on Unlock 5 in Maharashtra and reopening Restaurants Guidelines)
कोरोनाच्या संकट काळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचं समाधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. “कोव्हिडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावं लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड लक्षणं दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते, ते आपण एक-एक करुन सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यांच्याकडून कररुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अवघा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असे ठाकरे म्हणाले.
कोव्हिडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्दैवाने काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करु, ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्या दृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती संबंधितांना पाठविली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 28, 2020
(CM Uddhav Thackeray on Unlock 5 in Maharashtra and reopening Restaurants Guidelines)
जीवनशैलीत बदल करा
सध्या सण-उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी होत आहे. लोकांचा संयम हाही महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तिन्ही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणाऱ्या आणि इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करु असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले.
संबंधित बातम्या
Unlock-5 Guidelines | सिनेमागृह, शॉपिंग मॉल उघडण्याची शक्यता, अनलॉक 5 च्या गाईडलाईन्स लवकरच
(CM Uddhav Thackeray on Unlock 5 in Maharashtra and reopening Restaurants Guidelines)