‘कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक ते सर्व करा,’ मुख्यमंत्री ठाकरेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्य महत्त्वाचे अधिकारी आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना जे जे आवश्यक असेल ते सर्व करा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मुंबई : कोरोनाचा नवा अवतार म्हणजेच ओमिक्रॉन व्हायरसची पूर्ण जगाने धास्ती घेतलीय. कोरोनाला थोपवण्यासाठी देशपातळीवर आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्य अधिकारी आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व करा, असे स्पष्ट निर्देश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा
“केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष द्या. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा,” असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त बैठकीला उपस्थित
कोविड-19 च्या नव्या रुपाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी यांची ही आढावा बैठक होती. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना video Conferencing साठी झूमद्वारे निमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक (IG), पोलिस आयुक्त/ जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिव्हील सर्जन, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता(Dean), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा टास्क फोर्सचे 2 प्रतिनिधी आदी अधिकारी उपस्थित होते.
नव्या व्हायरसचा चार पटीने जास्त संसर्ग
दरम्यान, बैठकीआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओमिक्रॉन हा विषाणू सध्याच्या विषाणूपेक्षा चारपट वेगाने पसरत आहे. आरटीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग ओळखता येऊ शकतो. लसीकरणाला हा विषाणू एस्केप करतो का ? हे पाहावं लागणार आहे. मी केंद्राला दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची यादी काढली जात आहे. या देशातून येणारे विमान थांबवले पाहिजेत. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो. या मागणीवर सध्या काही निर्णय झालेला नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. ओमिक्रॉन हा नवा कोरोना व्हायरस पूर्वीच्या व्हायरसच्या चार पट वेगाने पसरतो. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे टोपे यांनी सांगितले होते.
इतर बातम्या :