bullet train project: बुलेट ट्रेनचा उपयोग काय?, मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या; मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टवर पुन्हा टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर (bullet train project) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जोरदार हल्ला केला आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर (bullet train project) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जोरदार हल्ला केला आहे. कामाचं श्रेय मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आमच्याकडे बुलेट ट्रेनसाठी आग्रह करण्यात आला. आर्थिक केंद्रासाठीची मोक्याची जागा त्यांनी बुलेट ट्रेनसाठी घेतली. बुलेट ट्रेनचा उपयोग काय? अहमदाबाद ते मुंबई अशी बुलेट ट्रेन चालणार आहे. त्याचा काय उपयोग होणार आहे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईवर प्रेम आहे तर कांजूरची ओसाड जमीन का देत नाही? ती दिली तर बदलापूर अंबरनाथपर्यंत आम्ही जावू. मुंबईच्या पंपिगसाठी जागा देत नाही. धारावीसाठी जागा देत नाही आणि आम्हीच केलं म्हणतात. अडलेले अनेक प्रकल्प आहेत ते मार्गी का लागत नाही? असा सवाल करतानाच बुलेट ट्रेन करायचीच होती तर अहमदाबाद ते मुंबई का? नागपूर ते मुंबई अशी का नाही? या बुलेट ट्रेनचा उपयोग महाराष्ट्राला झाला असता. पण राजकीय गणितं असतात. त्यानुसार राजकारणी निर्णय घेतात. पण आपल्याला काय मिळालं याचा हिशोब जनतेने ठेवला पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मेट्रोला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. त्यानंतर झालेल्या छोटेखानी समारंभात ते बोलत होते. राजकारणात कोरोनानंतर एक साथ आली आहे. या रोगाचं आणि व्हायरसचं निदान झालं नाही. म्हणजे एक तर तुम्ही काही केलं नाही, केलं तर ते आम्हीच केलं. त्यातून नवीन काही केलं तर त्यात भ्रष्टाचार केला आहे. ही अशी नवीन साथ आली आहे. एक जाहिरात आहे. त्यानुसार मळमळतंय तळमळतंय लक्षणे एकत्रच सुरू होतात. डॉक्टरला प्रश्न पडतो काय करायचं? अशा रुग्णांकडे पाहण्याची गरज नाही, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नाव न घेता चढवला.
कौरवांचे चाळे महाराष्ट्र पाहतोय
आम्ही काय करतो तुम्हा काय करतो जनता बघतेच आहे. कौरवांचे चाळे बघू न शकणारा हा धृतराष्ट्र नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कोण काय काय करतो ते बघतोय. आम्ही काम करतो हे लोकांनी पाहिलं. त्यांनी रातोरात झाडांची कत्तल कशी केली ते पाहिलं. वाट लागली तरी चालेल, अशा पद्धतीने कामं केली. आम्ही अजिबात तसं काम करत नाही. पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता विकासकाम करत आहोत. तुम्हाला हॉस्पिटलला जाण्याची वेळच येऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
तोपर्यंत मास्क लावा
मास्क सक्तीकडून मास्क मुक्तीकडे निघालो आहे. आजच्या कार्यक्रमात केवळ मी आणि उपमुख्यमंत्र्यांनीच मास्क लावला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री जोपर्यंत मास्क लावत आहोत. तोपर्यंत तुम्ही मास्क लावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
आमची लाईन व्यवस्थित
मी चार कार्यक्रम केले. त्यातील दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीच्या खात्यांचा कार्यक्रम होता. शिवसेनेच्या खात्याच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. राष्ट्रवादीच्या खात्याच्या कार्यक्रमाला मी ऑनलाईन उपस्थित होतो. असं म्हणालयाल नको इकडो ऑनलाईन तिकडे ऑफलाईन धुसफूस सुरू झाली. आमच्यात काहीच वाद नाही. आमची लाईन व्यवस्थित आहे, अशी कोटी मुख्यमंत्र्यांनी केली.
मी पक्का मुंबईकर
मी पक्का मुंबईकर आहे. गेली 60 वर्ष बदलती मुंबई पाहतो. आज मेट्रोमध्ये बसलो. माँ आणि बाळासाहेबांनी मला ट्राममध्ये बसवलं. ट्राम गेल्याचं अनेकांना दुख होतं. रेल्वेने मी कॉलेजमध्ये असताना प्रवास केला आहे. प्लॅटफॉर्मवर उभं राहिल्यावर दरवाजा कुठे येणार याचा अंदाज येतो. रेटा लागतो आणि आपण आत जातो, पुन्हा रेटा लागतो आणि आपोआप बाहेर येतो. गर्दीत खिशात हात घालण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण खिशात हात घालण्याचा प्रश्नच येत नाही. एवढी गर्दी असते. म्हणूनच मोनो आणि मेट्रो हा त्यावरचा उपाय आहे, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray LIVE : मनसेची भव्य बाईक रॅली सुरू, थोडच्याच वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार