कर्मचाऱ्यांकडून नव्हे, कामगार युनियनकडून वसुली करा, अन्यथा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला हा इशारा
शरद पवार युवर डर्टी पॉलिटीक्स स्टॉप. तुमचे पैसे हे कष्टकऱ्यांचे जमा केलेले आहेत.

मुंबई : गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, त्यांची कामगार संघटना नावाची युनीयन ही त्यांच्या पिल्लावडांकडून चालविली जाते. त्या पिलावडांच्या युनीयननी २०१७ ला संप केला. त्या संपाच्या आधारे न्यायालयानं सांगितलं की, युनीयनकडून वसुली केली गेली पाहिजे. परंतु, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख सरकारला बदनाम करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून आठ हजार रुपये वसुली करायला लावत आहेत, असा आरोप सदावर्ते यांनी केला.
शरद पवार तुमच्या युनीयननं २०१७ चा संप केला. त्या संपाला सर्व कर्मचाऱ्यांचा पाठिंबा नव्हता. त्यामुळं युनीयनं दंड द्यावा. गरज पडल्यास युनीयनची इमारत विकावी. तेही कमी पडलं तर शरद पवार तुम्ही सिल्व्हर ओक विकून पैसे भरा. परंतु, कष्टकऱ्यांकडून पैशांची वसुली नको, असं सदावर्ते म्हणाले.
कष्टकऱ्यांकडून पैसे वसूल केल्यास शरद पवार यांच्या युनीयनला राज्यभर उघड पाडू. एमडी यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कायदेशीर बाब तपासतो. कायदेशीर नसलेल्या शरद पवार यांच्या संघटनेवर कारवाई करतो.
कष्टकऱ्यांना शरद पवार यांच्या पिलावडांनी त्रास द्यायचं सुरू केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयजयकार करणारे, जन भवानी म्हणणारे आणि एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांना हा त्रास दिला जात असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला.
बेकायदेशीर बदल्या थांबविण्यात याव्यात. शरद पवार युवर डर्टी पॉलिटीक्स स्टॉप. तुमचे पैसे हे कष्टकऱ्यांचे जमा केलेले आहेत. प्रत्येक करार असतो त्या करारानुसार पाच टक्के युनीयनला मिळत असतात. ते पाच टक्के तुमच्या युनीयनच्या अकाउंटला आहेत. त्यामुळं चालक-वाहकाकडून पैसे वसूल करू नका. अन्यथा पुन्हा कोर्टात उभं करा म्हणून सांगितल्याचं ते म्हणाले.
संपाची प्रोसीजर फॉलो झाली नव्हती. चालक-वाहकांची संपाला मान्यता नव्हती. त्यामुळं शरद पवार आणि त्यांच्या युनीयनच्या लोकांकडून वसुली करा, अशी तंबी सदावर्ते यांनी दिली.