नाशिकमध्ये कोरोनाची लागण झाल्याची अफवा, दोघांविरोधात गुन्हा दाखल
कोरोनाबाबात व्हाट्स अॅपवर खोटी माहिती (Corona Rumour on Social Media) पसरविल्या प्रकरणी नाशिकमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : कोरोनाबाबात व्हॉट्स अॅपवर खोटी माहिती (Corona Rumour on Social Media) पसरविल्या प्रकरणी नाशिकमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक लक्ष्मण काळे आणि सलीम पठाण यांच्यावर सोशल मीडियावर अफवा पसरविल्या प्रकरणी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील पाटोदा ठाणगाव या गावात एकाला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती त्यांनी व्हॉट्स अॅपवर शेअर केली होती (Corona Rumour on Social Media) .
कोरोना प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्यसह संपूर्ण देशात शासनाच्या वतीने कोरोना थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीही काही सोशल मीडियावर लोकांकडून कोरोनाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या ऋतिक काळे आणि सलीम पठाण यांनी केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत. ऋतिक हा येवला तालुक्यातील नागडे गावाचा रहिवासी आहे तर सलीम पठाण हा निमगाव मढ येथे वास्तव्यास आहे.
दरम्यान, कुणीही अशी खोटी माहिती पसरवू नये आणि नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असं आवाहन येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांनी केलं आहे.
कोरोनाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. याप्रकरणी प्रशासनही कठोर पाऊले उचलताना दिसत आहे.
पुण्यात काल (17 मार्च) अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरविण्यात आली होती. त्याअगोदर बीडमध्येही अशाच प्रकारे अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.