मोठी घडामोड… अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार? प्रकाश आंबेडकर आघाडीत राहणार की नाही?, दिल्लीत काय घडलं?
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात? असा प्रश्न उपस्थित होतोय.
नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेस महाराष्ट्रात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा समावेश होता. या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. या उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने अकोल्याच्या जागेसाठी उमेदवाराचं नाव निश्चित केलं आहे. पण अकोल्याच्या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची चर्चा होती. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहीले तर त्यांना अकोल्याची जागा सोडली जाईल, अशी माहिती होती. पण आता काँग्रेसने अकोल्याच्या जागेवर उमेदवार निश्चित केल्याने प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत राहतील की नाही? असा प्रश्न निर्माण होतोय.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वात आधी राजकीय मैत्री झाली. आंबेडकर यांच्या याच मित्राने त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. ठाकरे गटाच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी अनुकूल झाले. पण त्यानंतर बरेच दिवस प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या प्रस्तावाची वाट पाहत होते. काँग्रेसकडून आपल्या अधिकृतपणे मैत्रीचा हात पुढे केला जात नाही म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली.
यानंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची चर्चा सुरु झाली त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना मविआच्या तीनही पक्षांनी बैठकीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं. त्यानुसार पहिल्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने गेलेले वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी मविआवर मोठा आरोप केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला बैठकीला बोलावलं पण बैठकीत समाविष्ट करुन घेतलं नाही. आपल्याला बराच वेळ बाहेर ताटकळत बसवून ठेवलं, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव केली. यानंतर प्रकाश आंबेडकर स्वत: बैठकीसाठी गेले.
महाविकास आघाडी वंचितसाठी चार जागा सोडायला तयार असल्याची देखील माहिती समोर आली. पण ज्या जागांवर महाविकास आघाडीची ताकद कमी आहे, तिथे वंचितला जागा सोडली जात असल्याचा दावा वंचितच्या कार्यकर्त्यांचा असल्याचं प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने म्हटलं. या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं. शरद पवार आणि ठाकरे गटावर आपला विश्वास उडाला असून आपण काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटंल.
याबाबत वेगवेगळ्या घडामोडी आणि चर्चा सुरु असतानाच आज काँग्रेसने दिल्लीतल्या बैठकीत अकोल्यासाठी उमेदवाराचं नाव निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून अभय पाटील यांना अकोला मतदारसंघासाठी उमेदवारी देण्याचं निश्चित झालं आहे. हा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती
- चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
- अमरावती – आ.बळवंत वानखेडे
- नागपूर – आ.विकास ठाकरे
- सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
- कोल्हापूर – शाहू छत्रपती
- पुणे – आ.रवींद्र धंगेकर
- नंदुरबार – गोवाशा पाडवी (के. सी पाडवी यांचा मुलगा)
- नागपूर – आ.विकास ठाकरे
- गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
- गडचिरोली – नामदेव किरसान
- अकोला – अभय पाटील
- नांदेड – वसंतराव चव्हाण
- लातूर – डॉ. कलगे