अशोक चव्हाण यांनी मविआच्या जागावाटपात घोळ घातला? काँग्रेसमधून मोठी बातमी
काँग्रेमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा जो पेच निर्माण झालाय त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा दावा काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना दावा केलाय. याबाबत सूत्रांनी 'टीव्ही 9 मराठी'ला माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान तोंडावर आलं असताना महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच काही केल्या सुटताना दिसत नाही. शिवसेना ठाकरे गटाने सांगली जागेवर दावा केलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. या दोन्ही ठिकाणी उमेदवारांची देखील घोषणा करण्यात आली आहे. पण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा आधीपासून दावा आहे. या दोन्ही जागा काँग्रेसच्या पारंपरिक जागा असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झालाय. विशेष म्हणजे जागावाटपाचा हा पेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप आता काँग्रेस नेत्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस या दोन्ही जागा मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहे. त्यामुळे पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत.
अशोक चव्हाण यांनी मविआ जागावाटपात घोळ घातला?
काँग्रेमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा जो पेच निर्माण झालाय त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा दावा काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना दावा केलाय. याबाबत सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. अशोक चव्हाण यांची जागावाटपात महत्त्वाची भूमिका होती. चव्हाणांनी पारंपरिक जागांवर दावा केला नाही. त्यांनी पारंपरिक जागांवर दावा करायला हवा होता, असं काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी जाणूनबुजून हा घोळ केला, असा काँग्रेस नेत्यांना संशय असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काय?
काँग्रेस नेत्यांच्या आरोपांना आता अशोक चव्हाण यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेस नेते कमी पडले, असं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली आहे, अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे नाचता येईना आणि अंगण वाकडं असाच प्रत्यय टीव्हीवरच्या विधानांवरुन पाहून येतोय, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
‘खापर फोडण्यासाठी अशोक चव्हाण सोयीचे’
“महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना कोणत्याही प्रकारच्या जागावाटपात स्वारस्य राहिलेलं नाही. त्यांच्या पदरात अपयश पडलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वांनी महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची पार धुळधान केली आहे, अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे खापर फोडण्यासाठी अशोक चव्हाण सोयीचे आहेत. अशोक चव्हाण यांना बोलून काही फरक पडत नाही. कारण ते भाजपात गेले आहेत”, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सांगलीच्या जागेचा पेच आणखी वाढण्याची चिन्हं
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सांगलीच्या जागेचा पेच आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण काँग्रेसचा त्याला विरोध आहे. सांगलीची जागा ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी आमदार विश्वजीत कदम आज पुन्हा दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील दिल्लीत काँग्रेस हायकमांडला भेटून आपली भूमिका मांडणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तीन दिवसांच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार आहेत. असं असताना काँग्रेस नेते दिल्लीला जात आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.