काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी! बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलाच नव्हता?
बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची बातमी खोटी होती. याबाबत त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे संबंधित बातमी समोर आली तेव्हा थोरातांनी मौन पाळलेलं.
रायपूर : काँग्रेसचं (Congress) रायपूरमध्ये मोठं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. या अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं एक मोठं विधान समोर आलंय. बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची बातमी खोटी होती. याबाबत त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे संबंधित बातमी समोर आली तेव्हा थोरातांनी मौन पाळलं होतं. पण आता थोरातांनी आपण राजीनामा दिला असं कोणी सांगितलं? असा उलटसवाल केलाय. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी यू टर्न घेतला की खरंच राजीनामा दिला नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट पक्षात पडले. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार केल्याची माहिती समोर आलेली.
याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी रागात काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली. याशिवाय थोरातांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पत्र लिहित नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण होऊन बसल्याची तक्रार केलेली. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील हे थोरातांच्या घरी त्यांची मनधरणी करायला गेलेले.
बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दोन्ही उपस्थित होते. या बैठकीनंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेत पक्षात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलेलं. या सगळ्या वादानंतर रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान थोरातांनी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “मी राजीनामा दिला असं कोणी सांगितलं? पक्ष पातळीवर या संदर्भात चर्चा सुरू आहे. सगळ्या पक्षात हे असतं. मात्र काँग्रेसची चर्चा जास्त होतेय”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर पैसे वाटवाच्या केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली. “निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार होतं. मात्र पैसे वाटप करतं त्याची तक्रार नाही. जो आरोप आहे तो गंभीर आहे. मात्र प्रशासनाने काळजी घेऊ, असं आश्वासन दिलंय. कसब्याच्या निवडणूकीत आम्ही प्रचाराला गेलो. जर काँग्रेसमध्ये ताळमेळ नाही, असं म्हणता. मग घाबरता का? एवढी यंत्रणा कसब्यात प्रचारासाठी भाजपनं उतरवली”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी रायपूरमधील काँग्रेसच्या अधिवेशनाविषयी देखील प्रतिक्रिया दिली. “ऐतिहासिक स्वरुपाचं अधिवेशन आहे. भारत जोडो यात्रेनं इतिहास घडवला. एक ऐतिहासिक पाऊल त्यांनी टाकलं आहे. समविचारी लोकांना एकत्र आणण्याचं काम करतोय. काय निर्णय व्हायला हवा होता आणि काय झालंय हे जनता पाहतेय. जनता एवढी दुधखूळी नाही. धर्मावर आणि जातीवर राजकारण करू नये, अशा गोष्टीचं समर्थन करणारे आम्ही आहोत”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.