‘कोणाला वाईट वाटलं असेल तर खेद व्यक्त करतो’, अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
शायना एन. सी. यांच्या संदर्भातील अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांच्याकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे. "अरविंद सावंत कोणाला एका व्यक्तीला बोलले नव्हते ते सगळ्या 12 च्या 12 जणांना बोलले होते. तरी जर कोणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरुन महायुतीच्या नेत्यांकडून सावंत आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला जातोय. अखेर या प्रकरणावर महाविकास आघाडीतील दोन बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शायना एन. सी. यांच्या संदर्भातील अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांच्याकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे. “अरविंद सावंत कोणाला एका व्यक्तीला बोलले नव्हते ते सगळ्या 12 च्या 12 जणांना बोलले होते. तरी जर कोणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो. मात्र एकनाथ शिंदेंनी गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना ज्यांनी पक्षात घेतलं त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. बिल्कीस बानो यांच्या रेपिस्टची आरती ज्यांनी केली, ज्या वामन म्हात्रेने महिला पत्रकाला विचारलं होतं, अब्दुल सत्तारने सुप्रिया सुळेंना शिव्या दिल्या होत्या, ज्या संजय राठोड यांच्यावर गंभीर गुन्हा आहे त्यांच्यावर बोलणे गरजेचे आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. “सणामध्ये राजकारण करत नाही. सणाला शुभेच्छा देण्यासाठी आलोय. सर्वांना शुभेच्छा! सण साजरे होत असतात. राजकारण होत राहतं”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
नाना पटोले काय म्हणाले?
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “अरविंद सावंत सायना एन. सी. यांच्याबाबत नेमकं काय बोललेत हे मला माहीत नाही. पण, आमच्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल भाजपच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलं, त्याला भाजपा पाठिंबा देत आहे का? त्याही लोकांवर कारवाई केलेली नाही. त्यांच्यावर कारवाई का केली नाही? हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. भाजप सातत्यानं महाराष्ट्रात महिलांचा अपमान करत आहे हे आपण अनेक घटनांमध्ये पाहिलेलं आहे. चार-पाच वर्षांच्या लहान मुलींनाही या लोकांनी सोडलेलं नाही. शायना एन. सी. यांनी या प्रकरणावर नाना पटोले काय बोलतात? असा प्रश्न जेव्हा उपस्थित केलाय. पण मी ते वक्तव्य अजून बघितलेलं नाही. अरविंद सावंत यांचं मी वक्तव्य बघून प्रतिक्रिया देतो. जर ते चुकीचं असेल तर, निश्चितपणे आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.