‘बेटा अजित कितना खाया?’; विजय वडेट्टीवार यांनी उडवली खिल्ली
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या टीकेवर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
“बेटा अजित कितना खाया, सरदार ७० हजार कोटी.. बहुत खाया..ये ले तिजोरी की चाबी रख…”, अशी शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. राज्यात सध्या प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. लाडकी बहीण म्हणतात मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार या महाराष्ट्रात सुरू असल्याचेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार हे आज नाशिकच्या चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
विजय वडेट्टीवार यांचा मराठा आरक्षणावरुन घणाघात
विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही सरकारवर निशाणा साधला. “मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाले. आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण सरकार काय करणार? तारीख पे तारीख. लेखी देतात, कमिटमेंट करतात. पण पुढे काय? का पूर्ण करत नाही? सरकार आता का मागे हटलंय? विरोधक आमच्या बैठकींना येत नाही म्हणतात. पण मग आमची गरज काय? बहुमत असलेल्या पक्षाला आमची गरज काय? घ्या ना निर्णय. त्यांच्या हाताला काही बांधलंय का?”, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
“सरकारने निर्णय घ्यावा. मराठा समाजाला निर्णय द्यावा. दोन्ही समाज आज समोरासमोर उभे केले. एकाचे नेतृत्व एक दुसऱ्याचे नेतृत्व दुसरा करतोय. दोन समाजात सरकारने दरी निर्माण केली. जातीजातीत भांडणे लावून महाराष्ट्राचा विकास होणार नाही. सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही. नाहीतर खुर्च्या सोडा”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
‘खडाजंगीला सुरुवात, यापुढे कपडे फाडाफाड होईल’
महायुतीच्या मंत्र्यांमध्ये निधी वाटपावरुन खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. “खडाजंगीला सुरुवात आहे. आता यापुढे कपडे फाडाफाड होईल. कारण महाराष्ट्रात सध्या निधीची लुटालुट सुरु आहे. ठोसे मारण्यापर्यंत गोष्टी जाणार. महाराष्ट्रात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. या शीतयुद्धात ठोसे सुद्ध किंवा कपडेफाट युद्ध होऊ नये म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.