महाराष्ट्रातील काँग्रेस नेता मोदींची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. लोकसभेची निवडणूक आता पुढच्या आठवड्यात कधीही जाहीर होऊ शकते. असं असताना आता महाराष्ट्रातील एक बडा काँग्रेस नेता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तक्रार करणार आहेत.
सातारा | 6 मार्च 2024 : साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीची बैठक पार पडली. यावेळी महाविकास आघाडीतील आणि घटक पक्षातील सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या नावाने होत असलेल्या जाहिरातींबाबत टीका केलीय. “सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे. ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो. मात्र मोदी एक उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत. याविषयी कारवाई होईल का नाही माहित नाही”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
“निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग. मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करून द्यायचं नाही. आपल्या दावणीला बांधल्यासारखं या यंत्रणांचा वापर करायचा. रशिया चीनमध्ये जशी घटना बदलली गेलीय आता भारतात काम केलं जातंय. यामुळे महागाई बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख इंडिया आघाडीचे मुद्दे असणार आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची निवडणूक यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सर्व नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. यामध्ये स्थानिक नेत्याचा समावेश नाही. नेत्यांना धमकी देऊन पक्षांतर करायला भाग पाडणे, तुरुंगात टाकायचं, चार्जशीट फाईल करायची नाही. यासाठी सावध राहण्याची गरज आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
‘आमच्या राजकीय पक्षांच्या जरी काही चुका झाल्या असतील तर…’
“महाराष्ट्र हे दोन नंबरचं राज्य आहे. या ठिकाणी पक्षांना फोडायचं आणि विरोधी पक्षात काही दम राहिला नाही असं सांगायचं काम सत्ताधारी करत आहेत. मात्र जनतेला आमचे आवाहन आहे. आमच्या राजकीय पक्षांच्या जरी काही चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा भारताच्या जनतेला आणि भावी पिढीला देऊ नका. ही निवडणूक जनतेने हातात घेण्याची गरज आहे. संविधान वाचवण्याचे गरज आहे. आमच्या अपयशाची शिक्षा भावी पिढीला देऊ नका”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.