मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूवीर विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. देशातील अनेक विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी उदयास येताना दिसत आहे. या आघाडीचं इंडिया आघाडी असं नाव ठेवण्यात आलं आहे. या आघाडीचं नेतृत्व नेमकं कोण करेल? याबाबत अद्याप निश्चित असं काही ठरलेलं नाही. या आघाडीच्या नेत्यांची मुंबईत पुढच्या दोन दिवसांनी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे या इंडिया आघाडीच्या बैठकीला अवघे दोन दिवस बाकी असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे.
इंडिया आघाडीच्या आतापर्यंत पाटणा आणि बंगळुरु अशा दोन ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत आघाडीचा लोगो ठरण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत आघाडीच्या समन्वयकाची निवड होण्याची शक्यता आहे. ही आघाडी नेमकं कुणाच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणूक लढेल ते अद्याप निश्चित झालेलं नाही. पण त्याआधीच नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
नाना पटोले कॅगच्या अहवालावर बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं. “देशामध्ये इतके सर्व रस्ते तयार केले तर किती भ्रष्टाचार झाला असेल, या सगळ्या व्यवस्थेला बाजूला सारण्यासाठी यांच्याकडे काँग्रेसवर टीका साधण्याशिवाय दुसरं काही नाही. ते काँग्रेसवर जेवढी टीका करतील, तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे”, असा दावा नाना पटोले यांनी केला.
“लोकांना आता कळलेलं आहे की, काँग्रेस शिवाय या देशात दुसरा काही पर्याय नाही. या देशाचं संविधान असेल, या देशाची लोकशाही असेल आणि या देशाला न्याय द्यायचा असेल तर काँग्रेसच देऊ शकतं हा विश्वास जनतेच्या मनात दृढ होत चाललेला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनेतेने शिक्कामोर्तब करायला सुरुवात केली आहे”, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार अजित पवार बोलतात, अशी टीका राऊतांनी केली. याबाबत पटोले यांना विचारलं असता “भाजप जी स्क्रिप्ट लिहून देणार तेच अजित पवार यांना बोलावच लागणार. शरद पवार सांगत आहेत की, ईडीच्या भीतीमुळे हे सर्व लोकं भाजपसोबत गेली. हे बोलले नाहीत तर ईडी आपल्याविरोधात कारवाई करेल. त्यामुळे भाजपने लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसारच यांना बोलावं लागेल”, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.
यावेळी नाना पटोले यांना काँग्रेस पक्षात खरंच मोठी फूट पडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “मुंबईमधील लहान कार्यकर्त्यांचा विषय होता. त्याबद्दल माझी मुंबई विभागीय अध्यक्षांबरोबर झालेली नाही. याबाबत माहिती घेतल्यानंतर यावर मार्ग काढू. काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर जातील, अशी हवा भाजपकडून सोडली जात आहे तसं कुठेही होणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.