काँग्रेस आमदाराचा दावा खरा ठरला, काँग्रेसची मते फुटली, पाहा कुणाला झाला फायदा
विधानपरिषद निवडणुकीचा निकाला जाहीर झाला आहे. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसची मत फुटणार हा काँग्रेस आमदाराने केलेला दावा खरा ठरला आहे. काँग्रेसची ५ मते फुटली आहेत.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत मतं फुटू नयेत म्हणून सगळ्याच पक्षांनी काळजी घेतली होती. राज्यात हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत होते. कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. पण काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा खरा ठरला आहे. आपल्या पक्षाचे 4 मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. आपल्या पक्षाकडे पुरेसं संख्याबळ असल्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या जिंकून येतील, असा दावा ही कैलास गोरंट्याल यांनी केला होता.
गोरंट्याल म्हणाले की, तीन-चार लोकं हे फुटणार आहेत. त्यासाठी आम्ही रणनीती आखलेली आहे. आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते ठरवणार आहे. अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.
काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली आहेत. पण काँग्रेसची ५ मते फुटली तर मते अजित पवार गटाला मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये फुटलेली ती ४ मते कोणाची होती याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
अजित पवार गटाकडे ४२ आमदार होते. पण त्यांच्या उमेदवारांना ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला काँग्रेसची ५ मते फोडण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.