महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कलह, विश्वजीत कदम दिल्लीला जाताना काय म्हणाले?
"शिवसेनेनं काय करावं? हा प्रश्न माझा नाही. मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळावी", अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली.
महाविकास आघाडीत लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरुन पेच निर्माण झाला आहे. या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना लोकसभेची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सांगलीत वसंतदादा पाटील गट, कदम गट आणि मदनभाऊ गट एकत्र आले आहेत. तसेच जिल्ह्यातलं वातावरण हे काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नाही. पण तरीही ठाकरे गटाने सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या या भूमिकेला सांगलीतील काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम सांगलीच्या काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीला पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. विश्वजीत कदम यांनी दिल्लीत जाण्याआधी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“विशाल पाटील माझ्यासोबत आहेत. मी, विशाल पाटील आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही दिल्लीत जावून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली. “माझ्या माहितीनुसार, शिवसेनेची सांगली जिल्ह्यातील अंतर्गत बैठक आहे. म्हणून त्यांचा तो पक्षांतर्गत विषय आहे. बाकी आम्हाला अधिकृत सूचना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून मिळालेल्या नाहीत. माझी भूमिका ठाम आहे. काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा”, असं मत विश्वजीत कदम यांनी मांडलं.
अशोक चव्हाण यांच्यामुळे तिढा निर्माण झाला?
काँग्रेस नेत्यांकडून खासगीत भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांच्यामुळे जागावाटपात घोळ झाल्याचा दावा करण्यात आलाय. याबाबत विश्वजीत कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. “मला त्याची कल्पना नाही. गेल्या तीन-चार महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका चालू होत्या. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि त्या काळात निश्चितच अशोक चव्हाण हे सामील होते. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते. तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि इतर काही नेते होते. या बैठकांमध्ये ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आवश्यकता होती तेव्हा ते देखील होते. त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडली ते मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली.
‘वरिष्ठांकडून फॉर्म्युला समजून घेऊ’
“शिवसेनेनं काय करावं? हा प्रश्न माझा नाही. मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न करतोय. ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळावी”, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली. तसेच “आमच्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही. फॉर्म्युल्याची चर्चा शिवसेना करत आहे. फॉर्म्युला काय हे त्यांनी वरिष्ठांना कळवलं आहे. नेमका काय फॉर्म्युला आहे ते वरिष्ठांकडून समजून घेऊ”, असं विश्वजीत कदम म्हणाले.