‘महायुती सरकारचा हा 3600 कोटींचा घोटाळा’, प्रणिती शिंदे यांचा अतिशय गंभीर आरोप
मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर 3600 कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रणिती शिंदे यांच्या या आरोपांवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“पुतळा दुर्घटना म्हणजे सरकारचं हे 3 हजार 600 कोटींचे मोठे स्कॅम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. आज आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय. मात्र एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्ध्वस्त होतोय. सरकारचं हे 3600 कोटींचे मोठे स्कॅम आहे”, असा मोठा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
‘महाराजांचा एवढा मोठा अपमान सहन करणार नाही’
“एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हा पुतळा हवेने पडला. या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी स्वतः उद्घाटन केलं आणि त्याची अवस्था ही झाली आहे. वरून फक्त शो आणि आतमधून पोकळ असणारे हे सरकार आहे. लोकांची दिशाभूल करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही”, अशा इशारा प्रणिती शिंदे यांनी दिला.
दरम्यान, मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत युती सरकार विरोधात नारेबाजी करत निषेध आंदोलन केले. काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.